मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 09:26 AM2024-09-21T09:26:48+5:302024-09-21T09:29:36+5:30

मविआतील प्रमुख तीन पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून यातून आता जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.

Big news The rift in Mva is over Congress will fight for 100 seats how much Thackeray Pawar will get | मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?

मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?

Mahavikas Aghadi ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटप निश्चित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. मागील काही दिवसांपासून मविआतील प्रमुख तीन पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून यातून आता जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष प्रत्येकी १०० जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला ८४ तर इतर मित्रपक्षांना उर्वरित ४ जागा दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने आणि लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा विचार करून महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून केली जात होती. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंची शिवसेनाही जास्तीत जास्त लढण्यासाठी आग्रही होती. तर आम्ही लोकसभा निवडणुकीत कमी जागा घेऊन तडजोड केल्याने आता विधानसभा निवडणुकीत त्याची कसर भरून निघावी, अशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अपेक्षा होती. या सगळ्या बाबींमुळे मविआच्या जागावाटपाचे घोडे अडले होते. मात्र आता समोर आलेल्या नव्या फॉर्म्युल्यावर तीनही पक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लोकसभेला महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वांत कमी म्हणजे १० जागा घेतल्या होत्या. मात्र नियोजनबद्ध पद्धतीने या जागांची निवड केल्याने पवारांच्या पक्षाने सदर निवडणुकीत दमदार कामगिरी करत ८ जागा जिंकून आणल्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही कमी जागा घेत जास्तीत जास्त स्ट्राइक रेट ठेवण्याचा या पक्षाचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.

महायुतीत नेमकी काय आहे स्थिती?

राज्यातील सत्तारूढ महायुतीतील विधानसभा जागावाटपाच्या चर्चेला वेग आला असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.

अमित शाह हे २४ आणि २५ सप्टेंबरला नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये भाजपच्या नेत्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. ते मराठवाड्यातील भाजप नेत्यांशी २४ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा करतील. त्याच दिवशी रात्री ९ ते १० या वेळेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच या तीनही पक्षांचे अत्यंत निवडक नेते यांच्याशी चर्चा करतील. याच बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप दिले जाईल. हा फॉर्म्युला पितृपक्षात जाहीर करायचा की नवरात्रात याचा निर्णयही याच बैठकीत होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Big news The rift in Mva is over Congress will fight for 100 seats how much Thackeray Pawar will get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.