मोठी बातमी! पोलीस हवालदार पदासाठी तृतीयपंथीही ऑनलाईन अर्ज भरू शकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 08:55 AM2022-12-10T08:55:44+5:302022-12-10T09:09:01+5:30

पोलिस हवालदार पदासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी भरती प्रक्रियेत तृतीयपंथींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारची उच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती.

Big news! transgender can also apply online for the post of Police Constable | मोठी बातमी! पोलीस हवालदार पदासाठी तृतीयपंथीही ऑनलाईन अर्ज भरू शकणार

मोठी बातमी! पोलीस हवालदार पदासाठी तृतीयपंथीही ऑनलाईन अर्ज भरू शकणार

googlenewsNext

मुंबई - पोलिस हवालदार पदासाठी तृतीयपंथी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार अर्जात सुधारणा करणार असून ‘लिंग’ या श्रेणीत तृतीयपंथी या पर्यायाचा समावेश करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत निकष ठरविण्यात येतील, अशी माहिती राज्य  सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली. 

पोलिस हवालदार पदासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी भरती प्रक्रियेत तृतीयपंथींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत अपयशी ठरल्याप्रकरणी राज्य सरकारची उच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी या मुद्द्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकार ऑनलाइन अर्जात सुधारणा करणार आहे. ‘लिंग’ या श्रेणीत तृतीयपंथींचाही समावेश करणार आहे. त्याशिवाय सध्याच्या भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी दोन पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत, असे न्यायालयाला सांगितले.

राज्य सरकार २८ फेब्रुवारीपर्यंत नियम तयार करेल आणि त्यानंतरच शारीरिक, लेखी चाचणी घेण्यात येईल, असा आदेश न्यायालयाने दिला. गृह विभागाच्या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी भराव्या लागणाऱ्या अर्जात महिला व पुरुष, असे दोनच पर्याय असतात. या दोन पर्यायांबरोबर तृतीयपंथींसाठीही पर्याय उपलब्ध करावा, यासाठी दोन तृतीयपंथींनी मॅटमध्ये याचिका केली.  त्यावर मॅटने राज्य सरकारला तृतीयपंथींसाठी पर्याय उपलब्ध करण्याचा आदेश दिला. या आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तृतीयपंथींसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. १३ डिसेंबरपर्यंत तिसरा पर्याय उपलब्ध करण्यात येईल. तर शारीरिक चाचणी निकष निश्चित केल्यानंतर घेण्यात येईल व त्यानंतरच लेखी परीक्षा घेण्यात येईल

Web Title: Big news! transgender can also apply online for the post of Police Constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस