Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची भाजपाला धास्ती; राज्यात लोकसभेसोबत विधानसभा टाळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:47 AM2023-03-02T08:47:26+5:302023-03-02T08:51:31+5:30
उद्धव ठाकरेंची सहानुभूती रोखण्यासाठी भाजपची रणनीती
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत. विधानसभा निवडणुका वेळेवरच होतील. उद्धव ठाकरे यांना मिळणारी जनतेची सहानुभूती रोखण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. याचा परिणाम आगामी काळात दिसणार आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही म्हटले होते की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लवकर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वीही महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांची चिंता आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी तोडण्याची तयारी सुरू आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळते की काय, अशी काळजी भाजपला आहे.
लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात थेट लढत होते. याचा फायदा भाजपला मिळतो; पण विधानसभा निवडणुका सोबत घेतल्यास लोकसभा निवडणुकीत नुकसान होऊ शकते. कारण, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या नावावर मत पडणार आहे. तेव्हा ही लढत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होणार नाही.
काय आहे रणनीती ?
उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळताना दिसत आहे. ही सहानुभूती रोखण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अभियान चालविण्यास महाराष्ट्र भाजपला सांगितले आहे. तसेच, सामान्य जनतेपर्यंत काही मुद्दे पोहोचविण्यास सांगण्यात आले आहे. यात उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्व सोडणे आणि हिंदुत्वाच्या विरोधकांसोबत आघाडी करण्याचा मुद्दा आहे. उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या मार्गावरून स्वत:ला दूर केले. तसेच, ज्या काँग्रेससोबत बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत हातमिळवणी केली, या मुद्द्यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३५ जागा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली आहे.