Prakash Ambedkar मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; पहिली उमेदवार यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:34 AM2024-03-27T11:34:50+5:302024-03-27T11:36:57+5:30
Lok Sabha Election: "वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत," अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
Prakash Ambedkar ( Marathi News ) :वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. तसंच पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांसाठी आंबेडकर यांनी वंचितच्या उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. आम्ही जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांना महाविकास आघाडीने प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीची माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काल आमची सविस्तर चर्चा झाली. ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व दिलं जात नव्हतं, त्यांना प्रतिनिधित्व देण्याबाबतही बैठकीत आमची चर्चा झाली. तसंच मुस्लीम आणि जैन समाजालाही वाटा देण्याबाबत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांवरील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे. आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. जरांगे पाटलांच्या फॅक्टरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असं आम्ही महाविकास आघाडीला सांगितलं होतं. मात्र त्यांनी लक्ष दिलं नाही. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो," असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर
अकोला- प्रकाश आंबेडकर
चंद्रपूर - राजेश बेले
भंडारा गोंदिया - संजय केवट
गडचिरोली - हितेश मढावी
बुलढाणा - वसंत मगर
वर्धा - राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम - खेमसिंग पवार
अमरावती - प्राजक्ता पिल्लेवान
नागपुरातून काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its first list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 27, 2024
• The VBA State Committee has decided to support the candidate of Indian National Congress from Nagpur
• The VBA State Committee has decided to… pic.twitter.com/gAkaAzudy7
दरम्यान, रामटेक लोकसभेसाठी आम्ही आज दुपारी ४ वाजता उमेदवाराची घोषणा करू, असंही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.