एकाच घरातील चारही पिढ्या सैन्यात मोठ्या हुद्द्यावर
By Admin | Published: May 26, 2015 11:38 PM2015-05-26T23:38:22+5:302015-05-26T23:38:22+5:30
मोरवणे गाव : लष्करी शौर्याची गावची परंपरा आजही जतन, गावकरी जपतात आठवणी!
संजय सुर्वे -शिरगाव -चिपळूण दसपटी विभागातील मोरवणे गाव सैनिकांचा गाव म्हणून ओळखला जातो. त्यामागे लष्करी अधिकाऱ्यांचे कर्तृत्व आणि प्रेरणा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या गावच्या तरुणांना लष्करी सेवेत दाखल करणारे दूरदृष्टी असणारे कर्तबगार अधिकाऱ्यांच्या आठवणी मोरवणेवासीय आजही जपताना दिसतात.
गावची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पण, तब्बल चार पिढ्या लष्करातील मोठ्या हुद्द्यावर आज अखेर कार्यरत राहाणे हे खरेच कौतुकास्पद आहे. मोरवणे गावचे माजी सैनिक सुभेदार रामचंद्र दाजीराव शिंदे पहिल्या व दुसऱ्या महायुध्दात सहभागी होते. आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत त्यांचे सुपुत्र कर्नल गणपत रामचंद्र शिंदे हे १९३४ साली मराठा बॉईज बेळगावला भरती झाले. वयाच्या २१व्या वर्षी मराठा लाईट इन्फंट्रीचे कमिशन आॅफिसर झाले. १९४८च्या इन्डो-पाक युध्दात भाग घेतला. राष्ट्रपतीनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ‘मॅन्शन आॅफ डिसपॅच अॅवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
१९५९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या इन्डोनेशिया मोहिमेत शांतीदलाचे विशेष अधिकारी म्हणून काम पाहिले. १९६१ साली फर्स्ट मराठा फलटणचे नेतृत्व करत गोवा युध्दात भाग घेतला. १९६५ साली भारत-पाक युध्दातही त्यांनी फलटणचे नेतृत्व केले. त्यांची कर्तबगारी पाहून ‘बटालियन कमान्डंट कर्नल’ अशी बढती मिळाली. १९७२ साली गावच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात झोकून काम करणारे कर्नल गणपत शिंदे यांनी गावच्या अनेक तरुणांच्या जीवनाला दिशा दिली. १९७३ साली त्यांचे निधन झाले. त्यांचे सुपुत्र सुरेश शिंदे हेही कर्नल पदावरुन निवृत्त झाले असून, आपल्या लष्करी सेवेतील कर्तबगारीचा वसा त्यांच्या मुलाने घेतला आहे.
एका सुभेदाराची चौथी पिढी सामान्य सैनिक नव्हे; तर उच्चपदस्थ अधिकारी बनली आहे. कर्नल सुरेशरावांचे सुपुत्र मेजर मिलिंंद सुरेश शिंदे आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत. हा विषय एका घरापुरता सीमित राहात नाही. कर्नल गणपत शिंदे यांचे भाऊ मेजर कृष्णाजी शिंदे, सुभेदार हनुमंत शिंदे, डीएसपी श्रीपत शिंदे यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा समस्त मोरवणेवासीयांना अभिमान आहे.
मोरवणे गावचे माजी सैनिक सुभेदार रामचंद्र दाजीराव शिंदे पहिल्या व दुसऱ्या महायुध्दात सहभागी.
सुरेश शिंदे हेही कर्नल पदावरुन निवृत्त.
जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जातोय देशाभिमानाचा वारसा.
एका सुभेदाराची चौथी पिढी बनली उच्चपदस्थ अधिकारी.
मिलिंंद सुरेश शिंदे बनले सैन्यात
मेजर.