शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, चिन्हाबाबत दिला महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 02:27 PM2024-07-19T14:27:10+5:302024-07-19T14:28:06+5:30
NCP Sharad Pawar Symbol News: लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह ८ खासदार निवडून आणण्याच शरद पवार यशस्वी ठरले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे.
पक्षात पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह दिले होते. तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह ८ खासदार निवडून आणण्याच शरद पवार यशस्वी ठरले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगानं शरद पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवलं आहे. तर पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासह लढणाऱ्या उमेदवारांविरोधात काही उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह मिळालं होतं. दोन्ही चिन्हांमध्ये बऱ्यापैकी साम्य असल्याने काही ठिकाणी त्याचा फटका शरद पवार गटाला बसला होता. त्यामुळे पिपाणी चिन्हाविरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे. त्याबरोबरच केवळ तुतारी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णयही निवडणूक आयोगानं घेतला आहे.
याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या चिन्हांच्या यादीमध्ये ट्रम्फेट नावाचं एक चिन्ह होतं, त्याचं मराठीमध्ये तुतारी असं भाषांतर करून ते चिन्हाखाली लिहिण्यात आलं. तसेच त्या तुतारीचा प्रचार झाला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्याच मतदारसंघात आम्हाला फटका बसला. एका मतदारसंघाच या चिन्हाला ३४ हजार मतं पडली आणि तेवढ्याच मतांनी आमचा उमेदवार पराभूत झाला. दिंडोरीमध्ये या चिन्हाला १ लाख ३ हजार मतं पडली. लोकांच्यात नसणाऱ्या उमेदवारांना एवढी मतं पडू शकत नाहीत. याचा परिणाम आमच्या निवडणुकीवर होऊ शकतो. म्हणून आम्ही याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून तक्रार केली होती. राज्य निवडणूक आयोगाने १६ जुलै रोजी एक आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये पिपाणी आणि तुतारी ही चिन्ह गोठवण्यात आली आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांनी गतवर्षी केलेलं बंड आणि त्यांना ४० हून अधिक आमदारांनी दिलेली साथ यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झाले होते. पैकी अजित पवार गटाला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केलं होतं. तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं होतं. मात्र शरद पवार अल्पावधीत हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरले. त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत झाला होता.