रोहित पवारांना मोठा दिलासा! बारामती ॲग्रोवरील कारवाईस हायकोर्टाची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 06:24 PM2023-09-29T18:24:43+5:302023-09-29T18:25:22+5:30
Baramati Agro Latest News: 'जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते', अशा शब्दांत रोहित पवारांनी या दिलास्यावर ट्विट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची कंपनी बारामती अॅग्रोच्या दोन प्रकल्पांवर पर्यावरण विभागाने कारवाई केली होती. मध्यरात्री २ वाजता ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. 'जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते', अशा शब्दांत रोहित पवारांनी या दिलास्यावर ट्विट केले आहे.
राज्यातील २ मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता.
'बारामती ॲग्रो' च्या प्लांटवर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याबद्दल मी सर्वप्रथम हाय कोर्टाचे आभार मानतो, असे पवार म्हणाले. तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचे राजकारण करणे सोपे आहे. ते करणाऱ्यांनी करत रहावे. त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल, असा इशाराही रोहित यांना दिला.
महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय. एका अर्थाने राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही आहात, पण लोकशाहीत सामान्य जनता ही बाप असते, हे विसरू नका. त्यामुळे आज जरी तुम्ही खुशीत असलात तरी भविष्यात हेच अस्र तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही रोहित यांनी दिला आहे.