मोठा खुलासा! रायगडमध्ये सापडलेली 'ती' संशयास्पद बोट कुणाची?; ओमान कनेक्शन उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:52 PM2022-08-18T14:52:36+5:302022-08-18T14:53:16+5:30
पोलिसांनी तात्काळ या बोटीबाबत नौदल गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली. ऑन रेकॉर्ड ही बोट यूकेची असल्याचं आढळलं.
रायगड - विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यातच रायगडमध्ये २ संशयास्पद बोटी आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. गोकुळाष्टमी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे हत्यारांचा साठा असलेली बोट सापडल्याने यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी ही बोट आढळली. त्याबाबत प्राथमिक चौकशीत या बोटीचं ओमान कनेक्शन उघड झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट यूकेत रजिस्टर्ड आहे. यूकेतील एका कंपनीच्या नावावर ही बोट आहे. त्याची पडताळणी पोलिसांनी केली आहे. त्याचसोबत २ व्यक्तींबाबत पोलिसांना कळालं आहे. त्याचे पुरावे पोलिसांच्या हाती सापडले आहेत. या दोन्ही व्यक्ती इंडोनेशियाच्या नागरिक असल्याचं पुढे आलं आहे. तसेच एका ऑस्टेलियन नागरिकाबाबतही काही कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत.
ही लोकं कुठे आहेत त्याची माहिती पोलीस घेत आहेत. ही बोट ओमान येथे रेस्क्यू करण्यात आली होती. तिथे स्थानिक प्रशासनाने त्यांना रेस्क्यू केले होते. रेस्क्यू झाल्यानंतर ओमानमध्ये ही बोट ठेवण्यात आली होती. परंतु समुद्र खवळलेला असल्याने ही बोट तिथून अरबी समुद्रातून वाहत रायगडच्या दिशेला पोहचली. सकाळी ८ वाजता स्थानिकांना ही बोट दिसली. काही लोक बोटीवर गेले तेव्हा हत्यारांचा साठा सापडला. त्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी हत्यारांचा साठा जप्त केला. कागदपत्रे ताब्यात घेतली. पोलिसांनी तात्काळ या बोटीबाबत नौदल गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली. ऑन रेकॉर्ड ही बोट यूकेची असल्याचं आढळलं. त्याचसोबत मेरिटम सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपनीचं स्किटर एके ४७ च्या बॉक्सवर होते. त्यामुळे ही बोट नेपच्युन सिक्युरिटी मेरेटाइन असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे घातपात आणि दहशतीवादी कनेक्शनचा अद्याप प्राथमिक पुरावे मिळाले नाहीत.
सरकारनं तात्काळ दखल घ्यावी
महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून राज्याच्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ दखल घ्यायला हवी. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. संशयित कागदपत्रे सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्य सरकारने यावर त्वरीत टीम नेमून स्थानिक, राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी माजी मंत्री आणि स्थानिक आमदार आदिती तटकरे यांनी केली आहे.