ठाकरेंना धक्का! अखेर शिवसेना-भाजपा युतीची घोषणा; अमित शाह भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं महत्त्वपूर्ण ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 10:55 AM2023-06-05T10:55:40+5:302023-06-05T11:04:44+5:30
एकनाथ शिंदे- अमित शहांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर घेतली शिंदे, फडणवीस यांनी भेट.
आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. यावर रविवारी रात्री झालेल्या अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे असताना मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसले होते. निवडणूक एकत्र लढविली तरी सत्ता स्थापनेला उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली होती. यानंतर अडीज वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी फारकत घेत राज्यात सत्तांतर घडवून आणले होते. या सत्तासंघर्षात शिवसेना हा मुळ पक्ष एकनाथ शिंदेंकडे निवडणूक आयोगाने सोपविला आहे. यामुळे राज्यातील आगामी निवडणुकांत शिवसेना -भाजपाची युती पुन्हा एकदा दिसणार आहे.
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे शिंदे म्हणाले.
याचबरोबर राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आल्याचे शिंदे यांनी ट्विट केले आहे.
काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांची भेट घेतली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 5, 2023
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले… pic.twitter.com/MdLoqiPoy2
महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत आहोत. रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार, असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.