Maharashtra Politics: शिंदे गटाचे ‘ॲापरेशन युवासेना’! आदित्य ठाकरेंचे विश्वासू साथ सोडणार; ठाकरे गटाची चिंता वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:09 PM2022-11-08T13:09:10+5:302022-11-08T13:10:18+5:30
Maharashtra News: खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात रावबण्यात आलेले ऑपरेशन युवासेना यशस्वी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. मोठ्या संख्येने शिंदे गटाला मिळत असलेला पाठिंबा ठाकरे गटासाठी डोकेदुखी वाढवणार ठरत आहेत. पक्ष संघटना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे दौऱ्यांवर दौरे काढत आहेत. यातच आणखी एका जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. युवासेनेतील विश्वासू पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असून, शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे गटाने येथील ठाकरे गट फोडला आहे. या भागातील युवासेनेचे सात जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू किरण पांडव यांनी आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंच्या युवासेनेला सुरुंग लावण्याचे केल्याचे सांगितले जात आहे.
‘ॲापरेशन युवा सेना’ यशस्वी!
पूर्व विदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात किरण पांडव यांनी ‘ॲापरेशन युवा सेना’राबवले. यात त्यांना मोठे यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पूर्व विदर्भातील म्हणजेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील युवा सेनेला मोठा धक्का या घटनेने मोठे खिंडार पडले आहे. विदर्भातील महत्त्वाचे तरुण कार्यकर्ते यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत सर्वजण शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. हर्षल शिंदे, शुभम नवले, रोशन कळंबे, दिपक भारसागडे, कगेश राव, नेहा भोकरे, सोनाली वैद्य हे युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिंदे गटात जाणार आहेत. सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"