Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का! बारामतीतील NCPचा आक्रमक मोहरा BJPच्या गळाला; घड्याळ सोडून कमळ हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:46 PM2022-09-29T18:46:07+5:302022-09-29T18:46:58+5:30
आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या महिला नेत्याने केलेला भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Politics: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा तसेच राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामतीवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले असून, बारामतीमधीलच राष्ट्रवादीचा आक्रमक मानला जात असलेल्या एका महिला नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती धरला.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात पाटील यांनी जाहीर प्रवेश केला. यावेळी डॉ. पाटील म्हणाल्या की, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. ओबीसींना भाजपने न्याय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण घालवले परंतु भाजपची सत्ता येताच ओबीसींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळाले.
कोण आहेत अर्चना पाटील?
डॉ. अर्चना पाटील यांचे इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गाव आहे. इंदापूर तालुक्यातील लासूर्णेचे घराणे हे बडे प्रस्थ मानले जाते. डॉ. अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेला थोड्या मताने पराभव झला होता. अर्चना पाटील यांच्या प्रवेशाने हर्षवर्धन पाटील यांना चांगले बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच यापूर्वी पाटील यांनी महादेव जानकर यांच्या रासपचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. डॉ. पाटील यांची इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख आहे.
दरम्यान, अर्चना पाटलांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावात दौरे केले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी थेट सातारा जिल्हा निरीक्षकपदी डॉ. अर्चना पाटील यांची नियुक्ती केली होती.
सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"