Maharashtra Political Crisis: शिवसेनेला धक्के पे धक्का! जिल्हाप्रमुखच शिंदे गटात; शेकडो कार्यकर्तेही करणार ‘जय महाराष्ट्र’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 02:16 PM2022-08-02T14:16:06+5:302022-08-02T14:17:17+5:30
Maharashtra Political Crisis: शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबत नसून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. लवकरच ठाकरे पिता-पुत्र राज्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता आणखी एका जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला असून, जिल्हाप्रमुखांसह शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे दावेदार आणि शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम यांनी शेकडो शिवसैनिकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा आणि शिंदे गटात सामील होण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांची पुढील राजकीय दिशा काय असणार याची सर्वत्र चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. परंतु, त्यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शन आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यातून या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे सांगितले जात आहे.
शिंदे गटात सामील होणार असल्याचे जाहीर केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हदगाव मतदार संघात आणून हदगाव हिमायतनगर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करायला लावून शिंदे गटात सामील होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या येण्याने बळ मिळालेल्या नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेला हदगाव तालुक्यात मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, बाबुराव कदम कोहळीकर हे हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात निवघा जिल्हा परिषद निवडणुकीपासून सुरू केली असून, त्या गटातून ते दोनवेळा विजयी झाले होते. सलग पंचवीस वर्षे त्यांनी आपल्या गटावर शिवसेनेचा भगवा फडकविला होता, हे सर्वश्रुत आहे. सन २००८ मध्ये शिवसेनेकडून विधानसभा लढवली, कोहोळीकर यांचा तेव्हा पराभव झाला होता. शिवसेनेची मोठी फळी त्यांच्यासोबत होती.