Maharashtra Politics: “शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट”; ठाकरेंवर टीका करत बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 03:33 PM2022-10-27T15:33:13+5:302022-10-27T15:33:49+5:30
Maharashtra News: शिवसैनिकांचा मान-सन्मान राहिला नाही. साधी दखलही घेत नाही. पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरेंना भेटूही देत नाही, असे अनेक गंभीर आरोप करत बड्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, दौरे यांचे सत्र सुरू झाले आहे. राज्यभरातून शिंदे गटाला मिळत असलेला मोठा पाठिंबा शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड वाढताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत एका बड्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेमार्फत जनतेची सेवा करणारे निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आताच्या घडीला शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट अशी परिस्थिती झाली आहे, असा गंभीर आरोप करत भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला.
शिवसैनिकांना किंवा कार्यकर्त्यांना आता मान सन्मान राहिला नाही
सर्वसामान्य शिवसैनिकांना किंवा कार्यकर्त्यांना आता मान सन्मान राहिला नाही. बार्शी तालुक्यात शिवसैनिकांना साधी इन्ट्री देखील नव्हती त्यावेळी शिवसेना वाढविण्यात मोठा प्रयत्न केला. तरीही पक्षातील पक्षश्रेष्ठी हे पक्ष प्रमुखांशी भेटूही देत नाहीत, असा आरोपही आंधळकर यांनी केला आहे. तसेच बार्शी तालुक्यात शिवसेनेसाठी साधा भगवा धागा बांधणे शक्य होत नव्हते. आजूबाजूला भीतीदायक वातावरण होते. त्यावेळी शिवसैनिक म्हणून बार्शीत शिवसेना वाढवली. कोरोना काळात दहा ते पंधरा लाख लोकांना शिवसेनेमार्फत जेवण खाऊ घातले तरी पक्ष प्रमुखांनी साधी दखलही घेतली नाही. नाव घेऊन कौतुक करत नाहीत. यासाठीच उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केल्याचे आंधळकर यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन आंधळकर यांनी ढाल तलवार हाती घेतली. बार्शी तालुक्यात तीन वेळा विधानसभा निवडणुका झाल्या. २०११ पासून बार्शी तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्य केले. आजतागायत आमदारकीचं तिकीट देताना तीन वेळा जाणूनबुजून डावलण्यात आले, असा आरोपही आंधळकर यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"