बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 09:47 PM2024-11-10T21:47:12+5:302024-11-10T21:47:33+5:30
शिवकुमारसह त्याच्या इतर दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
Baba Siddique :बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश STF च्या संयुक्त कारवाईत रविवारी(दि.10) नानपारा बहराइच जिल्ह्यातून मुख्य आरोपी शिवकुमार उर्फ शिवा गौतम (20) याला अटक करण्यात आली आहे. शिवकुमार नेपाळला पळून जाण्याची योजना आखत होता, मात्र त्याआधीच सापळा रचून त्याला अटक करण्यात आले. अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेशेंद्र प्रताप सिंग यांनाही शिवकुमारला आश्रय देणे आणि नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
शिवकुमारचे चौकशीत मोठे खुलासे
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य शूटर शिवकुमारने यूपी पोलिसांच्या चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे. शिवकुमारने चौकशीदरम्यान सांगितले की, तो लॉरेन्श बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. तसेच, परदेशात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या सांगण्यावरुनच त्याने बाबा सिद्दिकींना मारल्याचे शिवकुमारने चौकशीदरम्यान कबुल केले. तसेच, शुभम लोणकरने त्याचे अनमोल बिश्नोईशी अनेकदा फोनवर बोलणे करुन दिल्याचेही त्याने सांगितले.
यापूर्वी दोन शूटर्ससह 11 जणांना अटक करण्यात आली
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयित शूटर्ससह 11 जणांना अटक केली आहे. मात्र, मुख्य शूटर आणि दोन सूत्रधार अजूनही फरार होते. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. या अटकेमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील सर्व पैलू समोर आल्यानंतर खुनाचे खरे कारण समोर येऊ शकेल, असा पोलिसांचा विश्वास आहे.