बाबा-बुवांना राज्यमंत्रिपदे मिळतात हीच मोठी शोकांतिका - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:52 PM2018-04-07T23:52:08+5:302018-04-07T23:52:08+5:30
देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.
मुंबई : देशातील एका राज्यात बाबाबुवांना सत्तेत राज्यमंत्रिपद बहाल केली जातात आणि याविरोधात समाजातून साधा आवाजही उठविला जात नाही, हीच या देशाची मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा स्वागत व अंमलबजावणी’ ही राज्य परिषद झाली. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सामाजिक सुधारणेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याची गरज आहे. अंनिसला त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सर्वार्थाने मदत करेल, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले.
शिवसेनेच्या उपनतेत्या आमदार नीलम गोºहे म्हणाल्या की, कायदा राबविताना सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे़
आपापल्या विभागातील
प्रत्येक पोलीस स्टेशनवरील
अधिकारी व शिपाई यांच्यापर्यंत आजची ही कायद्याची पुस्तिका पोहोचली पाहिजे़
हा कायदा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी एक वर्षाची प्रचार यात्रा काढणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.
ही यात्रा १ मे महाराष्ट्र दिनी मुंबईहून सुरू होऊन सर्व जिल्ह्यातून नागपूर येथे १ मे २०१९ ला संपेल. तीन वर्षांत समाजसुधारणेमधे अग्रणी असलेला महाराष्ट्र जातपंचायतमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा यामागचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.
परिषेदला फेडरेशन आॅफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे नरेंद्र नायक तसेच पंजाब, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड येथील प्रतिनिधी उपस्थित होते. जातपंचायतीच्या मनमानीने बाधित व्यक्तींची सुटका करून प्रतिकात्मक रूपात परिषदेचे उद्घाटन झाले. बरखास्त केलेल्या १३ जातपंचायतींच्या प्रतिनिधींचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी कायदाविषयक चित्रमय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
- केवळ कायदा करून आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही. जोपर्यंत समाजमन हा बदल स्वीकारत नाही तोवर अविरत काम करावे लागेल. समाजबदलासाठी उत्साहाने काम करण्यास तयार असलेला आजचा मेळावा बघून आज मला निवांत झोप लागेल, अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भावना मांडली.