मोठा ट्विस्ट: नितीश कुमारांना फोन केल्याची चर्चा; मात्र स्वत: शरद पवारांनीच केला खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 03:59 PM2024-06-04T15:59:13+5:302024-06-04T16:00:39+5:30

Maharashtra lok sabha election 2024: शरद पवार यांनी जेडीयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संपर्क केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं होतं.

Big twist lok sabha election 2024 result talk of calling Nitish Kumar But Sharad Pawar gave clarification | मोठा ट्विस्ट: नितीश कुमारांना फोन केल्याची चर्चा; मात्र स्वत: शरद पवारांनीच केला खुलासा, म्हणाले...

मोठा ट्विस्ट: नितीश कुमारांना फोन केल्याची चर्चा; मात्र स्वत: शरद पवारांनीच केला खुलासा, म्हणाले...

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यास अपयश आल्याने आता प्रादेशिक पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी एनडीएतील पक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी आता इंडिया आघाडीकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेडीयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संपर्क केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र स्वत: पवार यांनी हा दावा खोडून काढत मी इंडिया आघाडीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्यांना संपर्क केला नसल्याचा खुलासा बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.

"मी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना फोन केला, अशा बातम्या टीव्हीवर दिसत आहेत. मात्र मी असा कोणताही फोन केला नाही. माझं बोलणं फक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांसोबत झालं आहे. बाकीच्या नेत्यांसोबत संवाद साधायचा की नाही, याचं धोरण आमच्या आघाडीतील इतर नेत्यांशी विचारविनिमय करून ठरवलं जाईल," अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन; काय म्हणाले शरद पवार?

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत शरद पवार म्हणाले की, "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्ट घेतले. या कार्यकर्त्यांबाबत मी संघटनेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. हा निकाल परिवर्तनाला पोषक असा आहे. देशपातळीवरील चित्र अत्यंत आशादायक आहे. उत्तर प्रदेशात सर्वसाधारपणे तुम्हा लोकांचं आणि आमच्यातील काही लोकांचा जो अंदाज होता, त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिला आहे. उत्तर प्रदेशच्या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, या भागात भाजपला आधी यश मिळाल्यानंतर त्यांचं मताधिक्यही मोठ्या प्रमाणात असायचे. मात्र या निवडणुकीत त्यांना ज्या जागा मिळाल्यात, त्यातील मताधिक्यही मर्यादित आहे," असं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्या इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला आम्ही जाणार आहोत, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. 

उद्धव ठाकरे, नाना पटोलेंबद्दलही बोलले पवार!

"महाराष्ट्रात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयंत पाटील यांच्या नेतृत्वात मर्यादित जागा लढवल्या. मात्र १० पैकी सध्या आम्ही ७ जागांवर पुढे आहोत. हे यश आमच्या एकट्याचं यश नाही. राज्यात आम्ही जी महाविकास आघाडी केली, त्यातील उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह प्रत्येक नेत्याने एकजीवाने मेहनत केल्यामुळे आघाडीला हे यश मिळालं आहे. परिवर्तनाचं वातावरण असून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित राहून भविष्यात दिशा ठरवू ," असं पवार म्हणाले.
 

Web Title: Big twist lok sabha election 2024 result talk of calling Nitish Kumar But Sharad Pawar gave clarification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.