Maharashtra Politics: “शरद पवार मुख्यमंत्री बनायची वेळ आली, तेव्हा शिवसेना फुटली, हा कुटील कट”: अभिजीत बिचुकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:58 AM2022-10-18T10:58:38+5:302022-10-18T11:05:20+5:30
शिवसेना नवरा, भाजप बायको, अतिशय सुंदर संसार चालला होता दोघांचा. त्या दोघांनी बहुतेक एक नाट्य केलेले आहे, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्याचे राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने घेतलेल्या माघारीनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय सोपा मानला जात आहे. मात्र, उमेदावारी मागे घेण्यावरून भाजपवर निशाणा साधला जात आहे. यातच आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत एक विधान केले आहे. शरद पवार मुख्यमंत्री बनायची वेळ आली, तेव्हा शिवसेना फुटली, हा कुटील कट असल्याचा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना संपूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी झालेला हा कुटील कट आहे. जेव्हा त्यांचा मुख्यमंत्री बनायची वेळ आली, त्याच वेळी शिवसेना फुटली. शिवसेना नवरा, भाजप बायको, अतिशय सुंदर संसार चालला होता दोघांचा. त्या दोघांनी बहुतेक एक नाट्य केलेले आहे, असा आरोपही अभिजीत बिचुकले यांनी केला.
मास्टरमाईंड कोण तरी आहे
अडीच वर्षांनी जर शिवसेना फुटत असेल, तर मास्टरमाईंड कोण तरी आहे, मला माहिती नाही. गेले तीन चार महिने एकमेकांवर यथेच्छ आरोप-प्रत्यारोप करणारे जर अर्ज माघार घेत असतील, तर आता महाराष्ट्रात अभिजीत बिचुकलेचाच प्रत्येक आमदार आणि खासदार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, सध्या राज्यात सुरु असलेले राजकारण हे जनतेच्या हिताचे नाही तर कोण मोठा यावरुनच सुरु आहे, असे अभिजित बिचुकले यांनी म्हटले होते. शिवसेना आणि शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाला राजकीय स्वार्थ साधायचा आहे, असाही आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला होता.
दरम्यान, अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी भाजपला ही पोटनिवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक आम्ही १०० टक्के जिंकणार होतो. पण यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी जेव्हा कुणा लोकप्रतिनिधीचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी रिंगणात उतरले असेल, तर भाजप उमेदवार देत नाही, ही आमची संस्कृती आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"