बारामतीतील पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंची EVMवर शंका; शरद पवारांना पाठिंबा, PM मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 17:14 IST2024-12-08T17:09:02+5:302024-12-08T17:14:50+5:30

Abhijeet Bichukale Allegations on EVM Machine: शरद पवारांचा दारुण पराभव झाला असला तरी विरोधकांना १०० जागा मिळायला हव्या होत्या. बारामतीत मला २०० मते मिळायला हवी होती, ती मिळाली नाहीत म्हणजे EVM घोटाळा आहे. या लढाईत शरद पवारांसोबत आहे, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे.

bigg boss fame abhijeet bichukale claims that there is evm scam in maharashtra vidhan sabha assembly election 2024 and support to sharad pawar | बारामतीतील पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंची EVMवर शंका; शरद पवारांना पाठिंबा, PM मोदींना आव्हान

बारामतीतील पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंची EVMवर शंका; शरद पवारांना पाठिंबा, PM मोदींना आव्हान

Abhijeet Bichukale Allegations on EVM Machine: बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी बारामती येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच, बारामतीतूनही ते निवडणुकीला उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला. सातारा आणि बारामती या दोन्ही ठिकाणी अभिजीत बिचुकले यांना अनुक्रमे ५२९ आणि ९२ मते मिळाली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर खापर फोडायला सुरुवात केली. याचा निषेध म्हणून आमदारांना शपथबद्ध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनावर पहिल्या दिवशी बहिष्कार घातला. महाविकास आघाडीतील नेत्यांनी ईव्हीएमविरोधातील लढाई तीव्र केली आहे. यात आता अभिजीत बिचुकले यांनीही उडी घेतली आहे. बारामतीत पराभव झाल्यानंतर अभिजीत बिचुकले यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली असून, याबाबत शरद पवार यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. 

बारामतीतील पराभवानंतर अभिजीत बिचुकलेंची EVMवर शंका

मीडियाशी बोलताना अभिजीत बिचुकले यांनी काही दावे केले आहेत. सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक क्लिप पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ते बॅलेट पेपरवर मतदान घेण्याबाबत बोलत आहेत. मात्र आता त्यांना त्याचा विसर पडला असून ते 'ईव्हीएम'बाबत आग्रही आहेत. अमेरिकेत बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. त्यांच्यासारख्या विकसित देशांमध्ये अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर आपल्यासारख्या प्रगतशील देशांमध्ये ईव्हीएमचा आग्रह का? आचारसंहिता नसल्यामुळे उघडपणे बोलतो की, ईव्हीएममध्ये घोटाळा आहे की नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी श्रीरामचंद्रांना स्मरुन सांगावे, असे आव्हान अभिजीत बिचुकले यांनी दिले. 

शरद पवारांचे वय पाहता, त्यांचा दारुण पराभव जरी झाला असेल, तरी...

शरद पवार यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह आणि शंका उपस्थित केली आहे. शरद पवारांचे वय पाहता, त्यांचा दारुण पराभव जरी झाला असेल, तरी एवढा दारुण पराभव व्हावा, असे मला बारामतीमधील एक विरोधक म्हणूनही वाटत नाही. शरद पवारांचे कार्य मोठे आहे. विरोधकांना किमान शंभर तरी जागा मिळणे अपेक्षित होते. आता शरद पवार 'ईव्हीएम'बाबत बोलत असतील, तर ते गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये माझे स्टारडम मोठे आहे. मी कुठेही दिसलो की, माझ्या आजूबाजूला शंभर लोक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. बारामतीत निवडणुकीवेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पक्षाचे बॅच आणि उपरणे बाजूला ठेवून माझ्यासोबत फोटो काढत होते. बारामतीमध्ये माझ्यासोबत किमान हजार फोटो काढण्यात आले. मला कमीत कमी २०० मते तरी पडायला हवी होती ती पडली नाहीत, म्हणजे 'ईव्हीएम'मध्ये घोटाळा आहे. 'ईव्हीएम'विरोधात शरद पवार जर लढा उभारणार असतील, तर त्यांच्यासोबत या 'ईव्हीएम'च्या लढ्यामध्ये मी सामील असेन, असे अभिजीत बिचुकले यांनी स्पष्टपणे सांगितले.

Web Title: bigg boss fame abhijeet bichukale claims that there is evm scam in maharashtra vidhan sabha assembly election 2024 and support to sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.