दापोलीतील कृषी विद्यापीठात साकारणार देशातील सर्वात मोठे मत्स्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:06 AM2017-11-19T00:06:17+5:302017-11-19T00:06:30+5:30
येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात देशातील सर्वात मोठे मत्स्यालय साकारणार आहे. या मत्सालयाचा फेरफटका मारल्यानंतर एका वेगळ्याच दुनियेची सफर करून आल्याचे समाधान पर्यटकांना मिळणार आहे.
- शिवाजी गोरे
दापोली (जि. रत्नागिरी) : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात देशातील सर्वात मोठे मत्स्यालय साकारणार आहे. या मत्सालयाचा फेरफटका मारल्यानंतर एका वेगळ्याच दुनियेची सफर करून आल्याचे समाधान पर्यटकांना मिळणार आहे.
कृषी विद्यापीठातील आवारामध्ये ८ हजार ५०० चौ. फूट इमारतीत हे मत्स्यालय उभे राहणार असून, त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
समुद्र, खाडी, नदी, तलाव-धरण व विहिरीतील माशांचे जीवनमान कसे आहे, कशा प्रकारे ते जगतात, त्यांची खाद्ये कोणती, या सर्वांची परिपूर्ण माहिती या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे मत्स्य महाविद्यालय किंवा इतर विद्यार्थी यांना हे मत्स्यालय दिशादर्शक ठरणार आहे.
समुद्रातील काही मासे समुद्राच्या तळाशी खोल पाण्यात राहतात, तसेच काही मासे समुद्राच्या मध्यभागी, तर काही पाण्यात वर-वर राहतात. असे तिन्ही प्रकारचे दुर्मिळ मासे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आजपर्यंत आपण समुद्रातील मासे पाहिले आहेत, परंतु ते जिवंत कसे राहतात, हेही येथे पाहायला मिळणार आहे. या मत्स्यालयाची डिझाइन उतेकर फिशरीज प्रा. लि. या कंपनीने केली असून, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी रूपेश सपकाळ यांच्या संकल्पनेतून ते साकारणार आहे.
देशीसह विदेशी मासेही
मत्स्यालयाच्या सुरुवातीलाच २५ फुटांचा धबधबा असेल. धबधब्याच्या पाण्यात मासे ठेवण्यात येणार आहेत. त्यापुढे फिश टँक, २२ फूट लांब नदी असेल. यामध्ये मासे, अंडरग्राउंड टँक, मध्यभागी, वरच्या भागात अशा वेगवेगळ्या पद्धतीचे टँक ठेवले जाणार आहेत. दुर्मीळ माशांच्या आठवणी प्रत्येकासोबत राहण्यासाठी सेल्फी पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे. देशातीलच नव्हे, तर विदेशातील मासेसुद्धा इथे पाहायला मिळतील.
कोकण कृषी विद्यापीठातील मत्स्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना व अभ्यासक, पर्यटकांना फायदा व्हावा, शोभीवंत मासे पालन व मत्स्यशेती करणा-या लोकांना दर्जेदार माहिती मिळावी, याकरिता या मत्स्यालयाचा खूप उपयोग होणार आहे.
- डॉ. तपस भट्टाचार्य,
कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ