मध्य भारतातील सर्वात मोठ्या दुर्गोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 08:42 PM2017-09-20T20:42:29+5:302017-09-20T20:42:47+5:30
लक्ष्मीनगर येथे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे ‘लोकमत’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दुर्गोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.
नागपूर: लक्ष्मीनगर येथे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे ‘लोकमत’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दुर्गोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. लक्ष्मीनगर व्हॉलिबॉल मैदानावर आयोजित हा मध्य भारतातील सर्वात मोठा दुर्गोत्सव राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’ समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत घटस्थापना होईल.
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे हे १२ वे वर्ष आहे. धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल असणाºया या आयोजनाला ‘लोकमत’चेही सहकार्य लाभले आहे. मंडळाद्वारे साकारण्यात येणाºया माता दुर्गेच्या मूर्तीची निर्मिती गंगा नदीच्या मातीतून करण्यात आली आहे. नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलत असताना या उत्सवालादेखील आधुनिक ‘टच’ देण्यात आला आहे. यंदा येथे ‘मेट्रो’ची प्रतिकृती साकारण्यात येणार असून नागरिकांना प्रत्यक्ष ‘मेट्रो’त बसल्याचा अनुभव येथे घेता येणार आहे. सोबतच परिसरात ‘आयफेल टॉवर’ची प्रतिकृती असलेले प्रवेशद्वार आणि ‘थ्रीडी लाईट्स’ची रोषणाई राहणार आहे. नवरात्रात दररोज नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी येथे राहणार आहे. सोबतच नवीन पिढीमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी, यासाठी क्रांतिकारक भगतसिंग यांच्या आयुष्याच्या प्रवासाला चित्ररुपाने विशेष ‘गॅलरी’त साकारण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रसन्न मोहिले यांनी दिली आहे.