बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही केंद्राने मदत करावी - उद्धव ठाकरे
By Admin | Published: September 12, 2015 04:53 PM2015-09-12T16:53:17+5:302015-09-12T17:51:09+5:30
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असून केंद्र सरकारने ज्याप्रमाणे बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज दिले तशीच भरघोस मदत महाराष्ट्रालाही करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १२ - दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असताना केंद्र सरकारने बिहारप्रमाणेच महाराष्ट्रालाही भरघोस मदत केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौ-यावर असलेले उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.
केंद्र सरकारने बिहारसाठी सव्वा लाख कोटींचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे, त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. सरकारने त्यांना जरूर मदत करावी पण मग तशीच मदत महाराष्ट्रालाही मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकारने दुष्काळासाठी अनेक घोषणा केल्या आहेत, मात्र त्याची अमलबजावणी होणेही महत्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करून त्यादृष्टीने उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत, असे उद्धव यांनी सांगितले.
दरम्यान मांसाहार बंदीच्या वादावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. मांसाहार बंदीवर आमच्या बाजूने पडदा पडला आहे, त्यामुळे इतरांनी आता वाद चिघळवू नये अन्यथा नको ती परिस्थिती उद्भवेल असा इशारा उद्धव यांनी दिला.
शिवसेना राबवणार कन्यादान योजना
दरम्यान दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी शिवसेनेतेर्फे 'कन्यादा योजना' राबवण्यात येणार आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही योजना राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत सेनेकडून 'पीडितांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च उचलण्यात येईल' अशी माहिती उद्धव यांनी दिली.