जिद्दीच्या जोरावर ठरल्या बिहारच्या पहिल्या महिला रेल्वेचालक
By admin | Published: March 8, 2016 12:50 AM2016-03-08T00:50:09+5:302016-03-08T00:50:09+5:30
सामान्य जीवन तर सारेच जगतात... मात्र, वेगळे काहीतरी करण्याची... इतरांपेक्षा स्वत:ला असामान्य घडविण्याची, सिद्ध करण्याची तिची जिद्द महत्त्वाची ठरली. सोलापूर रेल्वे विभागातील एकमेव महिला
बारामती : सामान्य जीवन तर सारेच जगतात... मात्र, वेगळे काहीतरी करण्याची... इतरांपेक्षा स्वत:ला असामान्य घडविण्याची, सिद्ध करण्याची तिची जिद्द महत्त्वाची ठरली. सोलापूर रेल्वे विभागातील एकमेव महिला रेल्वेचालक असणारी ३५ वर्षीय अनिता राजीव राज-यादव सर्वसामान्यांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.
बिहारमधील त्या पहिल्या महिला रेल्वेचालक यापूर्वीच ठरल्या आहेत. अनिता या मूळच्या बिहार राज्यातील राहिवासी आहेत. त्यांचे वडील अभियंता आहेत. वडिलांसह कु टुंबीयांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन’मधील पदविका मिळविली. त्यासाठी त्यांनी झारखंड येथे जाऊन शिक्षण घेतले. लहानपणी टीव्हीवर यशस्वी ‘सेलीब्रिटी’ ना पाहणे त्यांचा छंद होता. याच छंदातून त्यांनी आजची वेगळी वाट निवडली. या वाटेवर त्यांनी ‘बिहारची पहिली महिला रेल्वेचालक’ ही ओळख मिळविली आहे.
रेल्वे चालविताना अनेक जण आश्चर्याने कौतुकाने पाहतात. आई, वडील, पती, सासूसह सासरच्या मंडळींना त्यांच्या कामाचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे धाडस दुणावते. कामाचा हुरुप वाढतो, असे अनिता आवर्जून सांगतात. त्यांची सासू बिहारच्या आरोग्य सेवेत आहेत. त्या सुनेच्या कामाविषयी त्यांचे छायाचित्र दाखवून माहिती देतात.
त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याचे अधिक साहस येते. त्यांचे पतीदेखील ‘बिझनेसमन’ आहेत. त्यांना ६ वर्षांची मुलगी आहे.
> एक को देखके दस लडकियाँ आगे बढेगी
या क्षेत्रात येण्याबाबत मुली फारशा इच्छुक नाहीत. येथील करिअरविषयी माहिती नसल्याने त्यांच्यामध्ये अनास्था आहे. या पार्श्वभूमीवर अनिता यांनी केलेले आवाहन मुलींना दिशादर्शक ठरावे. ‘इन्सान हिम्मत करे तो कुछ भी हो सकता है. लडकियाँ आगे बढे, और समेटले ये मोका. एक को देखके दस लडकियाँ आगे बढेगी.
> ‘मैं अपनी जिद पे आयी हूँ’...
बारामतीच्या रेल्वे स्थानकावर त्या मालवाहतूक रेल्वेतून ३६०० टन माल घेऊन आल्या होत्या. या वेळी त्यांच्याशी संवाद साधला. ‘मै अपनी जिद पे आयी हूँ’ असे त्या ‘लोकमत’ शी बोलताना सुरुवातीलाच सांगतात.
रेल्वेच्या परीक्षेलादेखील मोजक्याच मुली होत्या. निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी त्यांच्यासमवेत एक-दोन मुलीच होत्या. अवघड असूनही त्यांनी मोठ्या जिद्दीने, परिश्रमाने हे प्रशिक्षण भुसावळ येथे पूर्ण केले. त्यानंतर त्या सोलापूर रेल्वे विभागात दौंड (जि. पुणे) येथे सहायक रेल्वेचालक पदावर रुजू होऊन स्वत:ला सिद्ध केले.
बिहारची कर्मभूूमी सोडून नोकरीनिमित्त त्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत. रेल्वे चालविण्याचे तंत्र त्यांनी जिद्दीने आत्मसात केले. वास्तविक महिला म्हणून त्यांना ‘आॅफिस’काम रेल्वे प्रशासन सहजपणे देऊ शकते. मात्र, त्यांना सहज, सोपे जीवन मान्य नाही. त्यांनी ही ‘ड्युटी’आवर्जून मागवून घेतली आहे. आता ७ वर्षांच्या अनुभवानंतर त्या स्वत: रेल्वेचालक म्हणून काम पाहत आहेत. मालवाहतूक, पॅसेंजर रेल्वे त्या सराईतपणे चालवितात.