बिहारचा ‘सिंघम’ महाराष्ट्राच्या वाटेवर!
By admin | Published: March 4, 2016 02:42 AM2016-03-04T02:42:21+5:302016-03-04T02:42:21+5:30
‘बिहारचा सिंघम’ अशी ख्याती असलेले डेअरडेव्हिल आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे महाराष्ट्रात लवकरच प्रतिनियुक्तीवर येण्याची शक्यता आहे.
यदु जोशी, मुंबई
‘बिहारचा सिंघम’ अशी ख्याती असलेले डेअरडेव्हिल आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे महाराष्ट्रात लवकरच प्रतिनियुक्तीवर येण्याची शक्यता आहे. त्यांनीच तशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे.
मूळचे अकोला जिल्ह्यातील पारसचे रहिवासी असलेले लांडे हे २००६च्या बॅचचे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते बिहारची राजधानी असलेल्या पटनामध्ये विशेष टास्कफोर्सचे अधीक्षक आहेत. मूळ इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले लांडे हे महाराष्ट्राचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. शिवतारे यांच्या कन्या ममता यांच्याशी ते दोन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले आहेत. लांडे महाराष्ट्रात परत का येऊ इच्छितात याचे कारण कळू शकले नाही. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी कारण सांगण्यास नकार दिला. एका पोलीस अधिकाऱ्यासाठी देशसेवा महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रतिनियुक्ती अर्जावर पुढील कारवाई करण्यास अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांना सांगितले आहे. गृह विभागाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे मतही मागविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडे यांच्या विनंतीअर्जावर पुढील प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. दुसऱ्या राज्याच्या कॅडरमध्ये आयपीएस असलेल्या अधिकाऱ्याला आपल्या गृहराज्यात पाच वर्षे प्रतिनियुक्तीवर जाता येते. प्रतिनियुक्तीचा हा कालावधी मुख्यमंत्री वाढवूदेखील शकतात.
> शिवदीप लांडे हे बिहारमध्ये कमालीचे लोकप्रिय पोलीस अधिकारी आहेत. पटना, अरारिया, पुर्णिया आणि जमालपूरमधील पोलीस अधीक्षकपदाची त्यांची कारकिर्द गाजलेली आहे.
मुलींची छेड काढणाऱ्यांना चांगलेच वठणीवर आणण्याच्या त्यांच्या ‘खास स्टाईल’ने ते चर्चेचा विषय ठरले.
पटनामध्यचे एसपी असताना त्यांची अरारियाला बदली झाली तेव्हा पटन्यातील नागरिक रस्त्यावर उतरले; मोठा कँडल मार्च काढून त्यांनी लांडे यांची बदली रद्द करण्याची मागणी केली होती.
लांडे आपल्या वेतनाची ६०% रक्कम समाजसेवेसाठी देतात.
सिंघम वा दबंग म्हणूनही परिचित असलेले लांडे यांनी माफियांच्या नांग्या ठेचल्याने त्यांचा दरारा अधिकच वाढला.