MLC ELETION : परभणी-हिंगोलीच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 09:33 AM2018-05-24T09:33:13+5:302018-05-24T14:10:36+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी मतदान झालं. त्यातील परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत.
परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी मतदान झालं. त्यातील परभणी-हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव करत बाजी मारली आहे. विप्लव बाजोरिया हे 256 मतं मिळवत विजयी झाले असून, काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांना 221 मतं मिळाली आहेत.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून विधान परिषद सदस्यांसाठी 21 मे रोजी मतदान झाले होते. 24 मे रोजी उस्मानाबाद येथे मतमोजणी नियोजित होती. प्रशासनाने मतमोजणीची तयारीही पूर्ण केली. दरम्यान, निवडणूक आयोगाने ही मतमोजणी तूर्त नियोजित दिवशी करू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी होणारी मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्देशात मतमोजणीची पुढील तारीख कळविण्यात आली नाही. त्यामुळे मतमोजणी केव्हा होणार याबाबत अनिश्चितता आहे.
मतदानानंतर स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या जागेवरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.