वाढवण बंदराच्या निषेधार्थ बाइक रॅली
By admin | Published: February 27, 2017 03:23 AM2017-02-27T03:23:06+5:302017-02-27T03:23:06+5:30
वाढवण बंदर उभारणीचे काम जे.एन.पी.टी कंपनी सरकारच्या सर्व यंत्रणांना हाताशी धरून करते आहे
डहाणू : वाढवण बंदर उभारणीचे काम जे.एन.पी.टी कंपनी सरकारच्या सर्व यंत्रणांना हाताशी धरून करते आहे. संघर्ष समितीने त्या विरोधात चालविलेले आंदोलन चिरडून टाकत असून त्याचा निषेध करण्यासाठी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वाढवण, वरोर, चिंचणी, तणाशी, वासगाव, बहाड, पोखरण, धाकटी डहाणू, गुंगवाडा या पंचक्रोशीतील गावात सुमारे पांचशे मोटार सायकलींची रॅली काढण्यात आली होती. त्यात सुमारे हजार तरुण सामील झाले होते.त्यांत समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, सचिव अशोक अंभिरे, खजिनदार वैकुंठ विंदे, सहसचिव वैभव वझे, हरेश्वर पाटील, सदानंद पवार उपस्थित होते.
ही रॅली वाढवण मुंडेश्वरी देवालयापासून निघून किनारपट्टीतील गावागावातून प्रचार करुन पुन्हा वाढवण समुद्रकिनारी पोहचली. तेथे तिचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर शंखोदाराला साक्षी घालून विधीवत पूजा करण्यात आली. डहाणूच्या पश्चिम किनारपटट्ीवरील वाढवण या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर जेएनपीटी व राज्य शासनाने मालवाहू बंदर करू घातल्याने या परिसरातील शेतकरी, डायमेकर, बागायतदार, लघु उदयोजकात कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला असून येथील लोकांचे आनंदमय जीवन उध्वस्त होणार असल्याने त्यास स्थानिक जनतेचा कडाडून विरोध आहे. तरीही लोकांच्या त्याला न जुमानता पोलिस बळाचा वापर करुन ठेकेदार कंपनीने समुद्रातील जलीय वनस्पती, जीव आणि नैसर्गिक संसाधनांवरील संशोधन. आणि गावागावातील सर्वेक्षण सुरूच ठेवल्याने डहाणू किनारपट्टीच्या २५ गावांतील हजारो प्रकल्पग्रस्तांनी आज रोजी या रॅलीद्वारे निषेध नोंदवला.
एका बाजूला वाढवण बंदरामुळे होणारे फायदे, रोजगाराचा प्रचार जेएनपीटीचे अधिकारी गावा गावात जाऊन करत आहे. परंतु वाढवण बंदर विरोधी कृती समितीच्या वतीने आज झालेल्या जाहीर सभेत जेएनपीटीकडून चालविला जात असलेला प्रचार चुकीचा व जनतेचा दिशाभूर करणारा आहे. असे समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले.