मुंबईत मराठा क्रांती मोर्चासाठी बाइक रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 06:34 AM2016-11-02T06:34:03+5:302016-11-02T08:12:41+5:30

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभर निघणारा मराठा क्रांती मूक मोर्चा अखेर मुंबईत मौन सोडणार आहे.

Bike Rally for Maratha Kranti Morcha in Mumbai | मुंबईत मराठा क्रांती मोर्चासाठी बाइक रॅली

मुंबईत मराठा क्रांती मोर्चासाठी बाइक रॅली

Next

चेतन ननावरे

मुंबई- गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभर निघणारा मराठा क्रांती मूक मोर्चा अखेर मुंबईत मौन सोडणार आहे. येत्या रविवारी ६ नोव्हेंबर रोजी सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाइक रॅली काढण्याची घोषणा मोर्चाच्या नियोजन समितीने केली आहे. कोपर्डीतील नराधमांना फाशी आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले जाईल, असेही समितीने सांगितले.
या आधी जिल्हानिहाय प्रतिनिधींच्या ९ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत १४ डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या सोबत मुंबईतून दिवाळीआधी निघणारा मोर्चा पुढे ढकलल्याचे समितीने सांगितले होते. मात्र मधल्या काळात सरकारवर दबाव राहावा, म्हणून बाइक रॅली काढण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यासाठी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दहिसर, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, शिवडी, वरळी या ठिकाणी बैठका पार पडल्या आहेत. उरलेल्या विभागांतही बैठका सुरू असल्याचे समितीने स्पष्ट केले.
सोमय्या मैदानावरून सकाळी ९ वाजता निघणारी ही बाइक रॅली सायन सर्कलहून सायन रूग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळाहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्थानकासमोर जाऊन धडकणार आहे. सीएसटीला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि कोपर्डी घटनेतील पीडितेचा श्रद्धांजली स्तंभ उभारून रॅलीची सांगता होईल. राज्यातच नव्हे, तर देशातील ऐतिहासिक व शिस्तबद्ध बाइक रॅली म्हणून या रॅलीची नोंद घेतली जाईल, असा दावा नियोजन समितीने केला आहे.
>महामोर्चाची रंगीत तालीम
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात, म्हणून नागपूर येथील अधिवेशनावर शेवटचा मोर्चा काढण्याचा निर्णय औरंगाबाद येथील बैठकीत घेण्यात आला आहे.
मात्र त्यानंतरही मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर मुंबईत सर्व जिल्ह्यांचा मिळून महामोर्चा काढणार असल्याचे समितीने सांगितले. त्या महामोर्चाची रंगीत तालिम म्हणून ही बाइक रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारने अधिक वेळ न दवडता मागण्या मान्य करण्याचे आवाहन समितीने केले आहे.
अशी असेल बाइक रॅली...!
रॅलीचे नेतृत्व महिलांकडे
चालकाला हेल्मेट घालणे बंधनकारक
सहचालक भगवा फेटाधारक असावा.
महिलांच्या बाइकवर काळा, तर पुरुषांच्या बाइकवर भगवा झेंडा
बाइकवर मराठा क्रांती (मूक) मोर्चा स्टिकर असावे.
वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.
रॅलीदरम्यान हॉर्न वाजवू नये किंवा घोषणा देऊ नये.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांतपणे मार्गक्रमण करावे.

Web Title: Bike Rally for Maratha Kranti Morcha in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.