स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला धडकून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 10:43 AM2021-11-29T10:43:50+5:302021-11-29T10:43:55+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावर रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला होता.
औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. एका बैठकीसाठी मुंबईला जात असताना तुपकर यांच्या गाडीला दुचाकी धडकली. त्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. पण, आता त्या अपघातातील एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविकांत तुपकर सोमवारी(22 नोव्हेंबर) रात्री आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईच्या दिशेने जात होते. यादरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होते. दुचाकीचा वेग जास्त असल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट तुपकर यांच्या इनोव्हा गाडीवर धडकली.
या अपघातात तुपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काहीच दुखापत झाली नाही, पण त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अपघातानंतर रविकांत तुपकर यांनी स्वतः धावाधाव करत जखमींना औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले होते. मात्र उपचार सुरू असताना यातील एका जखमी तरुणाची प्राणज्योत मालवली. तुषार परिहार असे मृत्युमुखी पडलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव आहे. तर दुसरा जखमी गजानन सोळंकी हा उपचार घेऊन घरी परतला आहे.