दुचाकी चोरीला जाऊ नये म्हणून...
By admin | Published: April 1, 2017 12:12 AM2017-04-01T00:12:07+5:302017-04-01T00:12:07+5:30
दुचाकी चोरी होणे, ही वाहनचालकांची सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी येथील अविनाश रामदास चौधरी
रामदास डोंबे / खोर
दुचाकी चोरी होणे, ही वाहनचालकांची सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. याला आळा घालण्यासाठी येथील अविनाश रामदास चौधरी या विद्यार्थ्याने आधुनिक पद्धतीचे उपकरण बनविले आहे. त्याच्या या प्रयोगाला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
अविनाश हा कासुर्डी येथील सुहास अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. वाघोली येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनात त्याने दुचाकी चोरीला जाऊ नये, म्हणून हा प्रयोग सादर केला. सध्याच्या परिस्थितीत दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार दुचाकीला जर पासवर्ड पद्धत अवलंबली तर गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण रोखता येईल, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्यानुसार दुचाकीला बॅटरी स्टार्टर ऐवजी पासवर्ड पद्धतीचे उपकरण तयार केले. यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने कीपॅडवर चुकीचा पासवर्ड टाकला तर त्या गाडीचे सायरन वाजून संबंधित व्यक्तीला मोबाईलवर मेसेज येतो. आपली गाडी कोणीतरी चोरून नेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा संदेश येतो आणि दुचाकीस्वार सतर्क होतो.
यामध्ये ‘जीएसएम’ नावाचे उपकरण बनविले आहे. जर एखाद्या व्यक्तीस कीपॅडचा पासवर्ड माहिती आहे, अशा वेळेस दुसऱ्याला पासवर्ड माहिती न होण्यासाठी ज्या व्यक्तीची गाडी आहे तो मोबाईलद्वारेही आपली गाडी सुरू करू शकतो. भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एस. एन. पाटील, प्राचार्य डॉ. टी. के. नागराज व डॉ. वाय. एस. अंगाळ यांच्या उपस्थितीत अविनाशला गौरविण्यात आले. दुचाकीतील उपकरण बनविण्यासाठी सुहास अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक के. आर. सकपाळ व आर. जी. दांडगे यांनी मार्गदर्शन केले.
राज्यस्तरीय बक्षिसाने गौरव
अविनाशला हे उपकरण तयार करण्यासाठी केवळ दोन हजार रुपये इतका खर्च आला आहे. मात्र हेच उपकरण लाखो रुपयांची दुचाकी गाडी चोरीस जाण्यापासून संरक्षण करते. त्याच्या या उपक्रमाची वाघोली अभियांत्रिकी विद्यालयाने दखल घेऊन अविनाश चौधरी यास प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय बक्षीस देऊन गौरविले.