बळीराजाची दिवाळी अंधारातच!, व्यापा-यांनी भाव पाडले, परतीच्या पावसाने कृषीमालाची प्रतवारी खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:04 AM2017-10-19T05:04:42+5:302017-10-19T05:05:14+5:30
परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत.
- योगेश बिडवई
मुंबई : परतीच्या पावसाने शेतमालाचे नुकसान झाल्याने बळीराजा दिवाळीत दुहेरी संकटात सापडला आहे. कृषीमालाची प्रतवारी खराब झाल्याचे सांगत ऐन दिवाळीत व्यापा-यांनी शेतक-यांची अडवणूक करत भाव पाडले आहेत. तर भारनियमनामुळे पाणी असून कृषिपंप बंद असल्याने दिवाळी अंधारातच साजरी होत आहे.
विदर्भात पावसामुळे शेतमाल खराब झाल्याचे सांगत व्यापा-यांनी भाव पाडले आहेत. गेल्या वर्षी कापसाला क्विंटलला ५२०० रुपये भाव होता. यंदा तो चार हजारांवर आला आहे. कृषीमालाची हमीभावाने खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश असले तरी व्यापाºयांनी त्यास दाद दिलेली नाही, अशी माहिती शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी ‘लोकमत’ला दिली. पावसामुळे कपाशी पडणे, बोंडे काळी होण्यासारखे संकट ओढवले आहे. चिखलामुळे कापूस वेचणीही अचडणीत आली आहे. सोयाबीन ओले झाल्याने त्यालाही भाव नाही.
मराठवाड्यात कडधान्यालाही फटका बसला आहे. उदीड, मुगाला क्विंटलला ३२०० ते ३४०० रुपये भाव आहे. तर सोयाबीन २७०० रुपयांपर्यंत विकले जात आहे.
सरकारी खरेदी केंद्रावर माल खरेदी करताना अटीच खूप असल्याचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शेतकरी अविनाश गुंजकर यांनी सांगितले. हिंगोलीत दोन केंद्रे जाहीर झाले असताना अजून एकही सुरू झाले नसल्याचेही ते म्हणाले.
पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातही धान्य बाजारात विशेष तेजी नाही. क्विंटलमागे मका ८०० ते १३०० तर सोयाबीन २४०० ते २८०० रुपये दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतक-याला खर्च निघणेही अवघड झाले आहे. नाशिक, पुण्यात दिवाळीतही भाजीपाला विक्रीतून चार चांगले पैसे मिळविण्याचे शेतक-यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.
गेल्या वर्षी कापसाला ५२०० ते ५५०० रु. भाव होता. या वर्षी
४ हजार रुपये भाव आहे. भावाअभावी शेतक-याचे दिवाळे निघाले आहे.
- विजय जावंधिया,
ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना
नाफेडमार्फत तेलबिया व कडधान्याची आॅनलाइन खरेदी करण्याचे आदेश सरकारने दिलेत. त्याचे राज्यातील संबंधित केंद्रांवरील कर्मचाºयांना प्रशिक्षणही दिले आहे. लवकरच खरेदी सुरू होईल. शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.
- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड
१०१ केंद्रांवर हमीभावाने खरेदी
राज्यात पणन मंत्रालयाकडून १०१ केंद्रांवर हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी सुरू असल्याचे सरकारी पातळीवर सांगितले जात आहे. मात्र अनेक केंद्रे अजून सुरू झालेली नाहीत, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ही खरेदी केंद्रे प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात आहेत. मक्याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही.
आॅनलाइन खरेदीचा गोंधळ
आॅनलाइन खरेदीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यासाठी शेतकºयाला सात-बारा उताºयासह इतर पुरावे द्यावे लागणार आहेत. सात-बारा उताºयावर नोंद नसल्यास त्याची सरकारी खरेदी होणार नाही.
शेतमाल हमीभाव प्रत्यक्ष दर
(क्विंटल/रु.) (क्विंटल/रु.)
भरडधान्ये ५,०५० ३२००-३४००
सोयाबीन ३,०५० २६००-२७००
कापूस ४,१२०-४३२० ४,०००
मका १,४२५ —-