अब्जावधी लोक करतात उघड्यावरच नैसर्गिक विधी
By Admin | Published: May 9, 2014 11:31 PM2014-05-09T23:31:32+5:302014-05-09T23:31:32+5:30
अश्मयुगापासून ते सायबरयुगापर्यंतच्या वाटचालीने मानवी जीवन सुखदायी झाले असले तरी विविध क्षेत्र समृद्ध करणारा मानवी समाज आजच्या २१ व्या शतकातही सार्वजनिक स्वच्छतेबाबत पिछाडलेलाच आहे.
जिनेव्हा : अश्मयुगापासून ते सायबरयुगापर्यंतच्या वाटचालीने मानवी जीवन सुखदायी झाले असले तरी विविध क्षेत्र समृद्ध करणारा मानवी समाज आजच्या २१ व्या शतकातही सार्वजनिक स्वच्छतेबाबत पिछाडलेलाच आहे. आजही जगभरात अब्जावधी लोक उघड्यावर नैसर्गिक विधी (मल-विष्ठा विसर्जन) करतात. वैयक्तिक आरोग्याबाबत जागृती निर्माण झाली असली तरी सार्वजनिक स्वच्छतेबाबत मात्र आजही कमालीची अनास्था आहे. पेयजल व स्वच्छता’ याबाबत काय स्थिती आहे, सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी काय उपाययोजना करणे जरुरी आहे, या विषयावर जागतिक आरोग्य संघटना व्यापक अभ्यास करून शिफारशींसह अहवाल करण्यात येणार आहे. उघड्यावर शौच केल्याने सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात. तसेच कॉलरा, अतिसार, कावीळ, विषमज्वर यासारख्या रोगांचा प्रार्दुभाव होतो. हे माहिती असुनही आजही याबाबत म्हणावी तेवढी जागरुकता निर्माण झालेली नाही, असे या कार्यक्रमाचे प्रभारी समन्वयक ब्रुस गॉर्डन यांनी म्हटले आहे. गॉर्डन यांच्या उपस्थितीत ‘पेयजल व स्वच्छता’ अभ्यास व पाहणी कार्यक्रमाची सुरुवात झाली. शौचालय बांधण्यासाठीही अनुदान उपलब्ध करून प्रोत्साहनही दिले जात आहे. असे असतानाही परिणाम मात्र फारसा समाधानकारक नाही. अनेक ठिकाणी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचा व्यवस्थित वापर होत नसल्याने ती वापरली जात नाहीत. काही ठिकाणी तर सामानसुमान ठेवण्यासाठी वापर केला जातो. मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करूनही सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत मात्र फारसे साध्य झालेले नाही. गरज आहे ती दृष्टीकोन बदलण्याची, असे मत युनिसेफ बालक निधीचे सांख्यिकीतज्ज्ञ रॉल्फ ल्युयेनदिज्क यांनी व्यक्त केले आहे. सर्वत्रच अनास्था आहे, असे नाही. अनेक देशांनी चांगली प्रगती केली आहे. व्हिएतनाम आणि बांगलादेशात १९९० मध्ये तिघांपैकी एक जण उघड्यावर शौचास जात होता. २०१२ पर्यंत ही प्रथा नष्ट झाली. उघड्यावर शौचाला जाणार्यांची संख्या आज जगभरात १ अब्ज असली तरी त्यापैकी ९० टक्के संख्या ग्रामीण भागातील आहे. (वृत्तसंस्था)
अनेक जण उघड्यावर, गटारी आणि ओढे-नाले किंवा तळ्याकाठी हा विधी उरकतात. १९९० मध्ये ही संख्या १.३ अब्ज होती. उप-सहारा आफ्रिकेतील २६ देशांत मात्र आजही ही वाईट प्रथा आहे. नायजेरियातील स्थिती अंत्यत वाईट आहे. युनोच्या पाहणीनुसार ८० देशांनी सार्वजनिक आरोग्याला घातक असलेली ही प्रथाच नष्ट करण्याच्या दृष्टीने चांगली प्रगती केली आहे. २०१५ पर्यंत जगभरातून ही प्रथाच नष्ट होईल, अस युनोचा अंदाज आहे.
भारतातही काही दुर्गम भागात ही प्रथा चालू असली तरी भारत सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमामुळे उघड्यावर शौचाला जाणार्यांची संख्या घटली आहे. गाव-खेड्यासह, शहर-निमशहर आणि मोठ्या शहरात सार्वजनिक स्वच्छतेवर भारत सरकारने अब्जावधींचा खर्च केला आहे.
दंडात्मक कारवाईसह विविध उपक्रम राबविले जात आहे. एका हातात मोबाईल आणि दुसर्या हातात डबडे घेऊन हगणदारीकडे जाणारे लोक, हे भारतातील चित्र धक्कादायक असल्याचे डब्ल्यूएचओच्या पब्लिक हेल्थ डायरेक्टर मारिया नीरा म्हणाल्या.