ग्राहक पंचायतचे संस्थापक बिंदूमाधव जोशी कालवश
By Admin | Published: May 11, 2015 02:59 AM2015-05-11T02:59:40+5:302015-05-11T02:59:40+5:30
भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक आणि राज्याच्या ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष बिंदूमाधव जोशी यांचे रविवारी दुपारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.
पुणे : ग्राहक जागृतीसाठी मोलाचे काम करणाऱ्या भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक आणि राज्याच्या ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष बिंदूमाधव जोशी यांचे रविवारी दुपारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. रविवारी रात्री उशिराने वैकुंठ स्मशानभूमीत अंतसंस्कार करण्यात आले.
गेले वर्षभर जोशी हृदय आणि फुप्फुसांच्या विकाराने आजारी होते. प्रकृती खालावल्यामुळे मागील आठवड्यात त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. १९७४मध्ये त्यांनी केलेली अखिल भारतीय ग्राहक पंचायतची स्थापना हा देशाच्या ग्राहक चळवळीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला. स्पष्टवक्तेपणाबरोबरच फर्डे वक्तृत्व हे त्यांचे वैशिष्ट्य होते. युती सरकारमध्ये त्यांच्याकडे असलेल्या राज्याच्या ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.