जैवविविधतेचा वारसा ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’
By Admin | Published: February 13, 2017 03:59 AM2017-02-13T03:59:12+5:302017-02-13T03:59:12+5:30
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड मार्गावरील ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ आजही पर्यटकांना खुणावतो.
गजानन चोपडे / नागपूर
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली-भामरागड मार्गावरील ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ आजही पर्यटकांना खुणावतो. राज्यातील जैवविविधतेचा वारसा म्हणून नावारूपास आलेले हे साग वृक्षाचे प्रचंड वन आहे.
१९५३ मध्ये आलापल्लीपासून १८ किमीवर या सागवानी वनवैभवाची निर्मिती करण्यात आली. ६ हेक्टरचे हे राखीव वनक्षेत्र असून यात करस्री, तेंदू, साग व बेल वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. यात ४०० वर्षांहून अधिक वयोमानचे सागवृक्ष अद्यापही ताठ उभे आहेत. याला लागूनच मिरकल वनतलाव असून हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देणारे देशी-विदेशी पर्यटक आवर्जून या स्थळाला भेट देतात.
कर्नाटक राज्याने २००७ साली पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करून आघाडी घेतली होती. त्या पाठोपाठ २०१४ मध्ये ‘ग्लोरी आॅफ आलापल्ली’ला वारसास्थळ घोषित करण्यात आले. गेल्या दोन वर्षांत त्यात नवीन जैवविविधतेची भर पडली नसली, तरी अलीकडे जळगाव जिल्ह्यातील लांडोरखोरी व रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास आणि आंजर्ला अशा तीन ते चार ठिकाणांचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे प्राप्त झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.विलास बर्डेकर यांनी दिली. यातील वेळास व आंजर्ला ही गावे सागरी कासवांसाठी प्रसिद्ध असून या गावांत ‘होम स्टे टुरिझम’ चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही डॉ. बर्डेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.