बायोगॅस प्रकल्पालाही सुरू झाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 04:03 AM2016-09-21T04:03:29+5:302016-09-21T04:03:29+5:30
बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांनीच खो घालण्याचा प्रकार सुरू आहे.
कल्याण : एकीकडे घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी अभावी शहरातील कचऱ्याचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे यावर उपाययोजना म्हणून बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांनीच खो घालण्याचा प्रकार सुरू आहे.
उंबर्डे येथे कचरा डम्पिंग करण्यास शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांचा विरोध कायम असताना आता भाजपाचे नगरसेवक विकास म्हात्रे यांनीही त्यांच्या प्रभागात बायोगॅस प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे डम्पिंग ग्राऊंड प्रमाणे आता बायोगॅस प्रकल्पालाही विरोध करण्याचे प्रकार सत्ताधाऱ्यांकडूनच सुरू झाल्याने घनकचरा व्यवस्थापन करायचे तरी कसे? असा यक्षप्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने केडीएमसी क्षेत्रात नवीन बांधकामांना बंदी घातली होती. यावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात ठोस उपाययोजना केल्या जात असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर बांधकाम बंदी उठविण्यात आली. परंतु आजवर ठोस अशी कृती घनकचरा व्यवस्थापनाबाबत झालेली नाही. दरम्यान, महापालिका क्षेत्रात १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू असून काही ठिकाणच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर प्रभागात बायोगॅस प्रकल्प उभारण्यास नगरसेवक म्हात्रे यांनी विरोध दर्शविला आहे.
१० मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने सादर केला होता. यावेळी म्हात्रे यांनी आपला या प्रस्तावाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. याठिकाणी उद्यानाचे आरक्षण आहे. त्यात बदल करण्यात आला आहे का? असा सवाल उपस्थित करताना म्हात्रे यांनी संबंधित प्रभागांमध्ये मोठी निवासी संकुले आहेत.
प्रस्तावित प्रकल्पामुळे त्यात राहणाऱ्या नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. तसेच ज्याठिकाणी प्रकल्प राबविला जाणार आहे ती जागा देखील महापालिकेच्या नावावर नाही याकडे लक्ष वेधले. यासंदर्भात त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला पत्र देऊन संपूर्ण प्रकल्पाची माहिती मागविली होती त्याचीही विचारणा बैठकीत म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. बायोगॅस प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही याला महासभेची मान्यता घेण्यात आली आहे. दरम्यान म्हात्रे यांचे पत्र मिळाले असून प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली जाईल आणि तांत्रिक अहवाल स्थायीला सादर केला जाईल असे स्पष्टीकरण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी दिले. यावर प्रस्तावित प्रकल्पाची संपूर्णत: माहिती पुढील सभेत सादर करण्याचे आदेश देताना संबंधित प्रस्ताव स्थगित ठेवण्यात येत असल्याचे सभापती संदीप गायकर यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)
>डोंबिवली पूर्वेतील प्रकल्पास मान्यता
डोंबिवली पूर्वेकडील आयरेरोड भागात
बायोगॅस प्रकल्प उभारण्याच्या अन्य एका प्रस्तावाला मात्र स्थायी समितीकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला.