वैद्यकीय उपचारपद्धती पक्षांतराचा जीवघेणा खेळ
By admin | Published: July 19, 2015 02:44 AM2015-07-19T02:44:14+5:302015-07-19T02:44:14+5:30
आपल्या भारत देशाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी महत्त्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रकारचे वैविध्य़ विविधता प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक इत्यादी अनेक
- डॉ. सुहास पिंगळे
(लेखक आय़एम़ए़, महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत.)
आपल्या भारत देशाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी महत्त्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रकारचे वैविध्य़ विविधता प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक इत्यादी अनेक विषयांमध्ये आढळते. राजकारणातही अनेक पक्षांचे अस्तित्व निवडणूक आयोगानेही मान्य केले आहे. अशीच एक बाब म्हणजे उपचारपद्धती.
प्रत्येक संस्कृतीची आपली एक उपचारपद्धती असणे हे अतिशय नैसर्गिक आहे. भारतीय मातीतील उपचारपद्धती म्हणजे आयुर्वेद. याच न्यायाने युनानी आधुनिक वैद्यक (अॅलोपॅथी हा कालबाह्य शब्द आहे़) होमीओपॅथी सिद्ध इ. उपचार पद्धती आहेत. पैकी ‘सिद्ध’ उपचार पद्धती तामिळनाडूत जास्त प्रचलित आहे. युनानी व आधुनिक वैद्यक या उपचारपद्धती अर्थातच जेत्यांजी आपल्याबरोबर या देशात आणल्या, रुजवल्या व वाढविल्या, जशा की जेत्यांच्या इंग्र्रजी, उर्दू, फारसी इ. भाषादेखील राजाश्रयामुळे या देशात वाढल्या.
यापैकी इंग्रजांनी आपल्या देशास लोकशाही, शिक्षणपद्धती, रेल्वे, टपालसेवा याबरोबर आरोग्य व्यवस्थेचीदेखील देणगी दिली. इतिहासकाळात ‘राजवैद्य’ ही संज्ञा आढळते, परंतु ‘फॅमिली डॉक्टर’ रुग्णालये, वैद्यक महाविद्यालये वगैरे अस्तित्वात होती किंवा नाही याबाबत सदर लेखक अनभिज्ञ आहे. अर्थातच इंग्रजांनी आधुनिक वैद्यकांच्या शिक्षणाचा पाया सर ज. जि. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करून घातला तो सुमारे १५0 वर्षापूर्वी. स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळक इ. पुढाऱ्यांनी जशा राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळा व कॉलेजेस काढली तशीच शिक्षणाची सोय वैद्यकाच्या इतर उपचार पद्धती म्हणजेच आयुर्वेद, युनानी इ. पद्धतींचे शिक्षण देणारी व्यवस्था स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरू झाली. राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांचा कल आयुर्वेदाकडे असणे हे स्वाभाविक म्हटले पाहिजे. मात्र खरी गंमत आणि गफलत यापुढे सुरू होते. एकीकडे वैद्यकीय शिक्षणाकडे असणारा ओढा व त्याभोवतीचे ग्लॅमर यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा बाजार स्वातंत्र्यानंतर सुरू झाला (मणीपाल) व आज २0१४ मध्ये बाजार प्रचंड फोफावून त्यातून अनेक शिक्षणसम्राट निर्माण झाले. दुसरीकडे पालक व त्यांचे पाल्य यांच्या मनात असलेल्या असुरक्षिततेपायी देणग्या देऊन डॉक्टर होणे यात कोणासच उणेपणा वाटेनासा झाला.
आज २१व्या शतकात नागरिकांच्या
विविध संस्था मतदारांचे प्रबोधन करताना असे सांगतात, की राजकीय पुढाऱ्यांची पूर्ण पार्श्वभूमी म्हणजेच शिक्षण, संपत्ती, गुन्हेगारी तपशील इ. समजून घ्या. राजकीय पक्षांचा इतिहास व जाहीरनामे समजून घ्या व मगच
योग्य व्यक्तीला मत द्या़ या धर्तीवर असे म्हणावेसे वाटते, की रुग्णांनी डॉक्टरांची पूर्ण माहिती करून घेऊन मगच त्यांच्या हाती आपले शरीर व आयुष्य सोपवावे!
डॉक्टर निवडण्याचे स्वातंत्र्य...
प्रत्येक उपचार पद्धती आदरणीय आहे. जन्ममृत्यूूचा फेरा व दु:ख, वेदना आजार इत्यादींची आयुष्यातील अपरिहार्यता बघता, जसे मतदारास मताचे स्वातंत्र्य आहे तसेच रुग्णास त्याच्या उपचाराची पद्धती निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र जसे ‘पक्षांतर’ हे लोकशाहीस मारक आहे, तसेच शिक्षण एका उपचार पद्धतीचे द्यायचे व व्यवसाय मात्र दुसऱ्या पद्धतीचा करावयाचा हे रुग्णाच्या तब्येतीला मारक आहे. म्हणूनच सरकारने आधुनिक उपचार पद्धतीकरिता मेडिकल कौन्सिल, होमीओपॅथीकरिता ‘सेंंट्रल कौन्सिल आॅफ होमीओपॅथी’ व आयुर्वेद, सिद्ध व युनानीकरिता ‘सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीन’ या स्वतंत्र नोंदणी करणाऱ्या परिषदा स्थापन केल्या आहेत.