तुरुंग विभागाच्या महासंचालकपदी बिपीन बिहारी यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 04:06 IST2017-12-22T04:04:10+5:302017-12-22T04:06:00+5:30
कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक असलेले बिपीन बिहारी यांची राज्याच्या तुरुंग विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आस्थापना मंडळाने दिलेल्या शिफारशीवरून गृहमंत्रालयाकडून हे आदेश काढले आहेत.

तुरुंग विभागाच्या महासंचालकपदी बिपीन बिहारी यांची नियुक्ती
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक असलेले बिपीन बिहारी यांची राज्याच्या तुरुंग विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आस्थापना मंडळाने दिलेल्या शिफारशीवरून गृहमंत्रालयाकडून हे आदेश काढले आहेत.
सेवाज्येष्ठता डावलल्यामुळे आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर बुधवारी त्यांना महासंचालकपदी बढती मिळाली. त्यांना होमगार्डचे महासमादेशक बनविण्यात आले आहे. गुरुवारी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यापाठोपाठ बिपीन बिहारी यांनाही गुरुवारी महासंचालकपदी बढती जाहीर करण्यात आली आहे.
बिहारी हे १९८७ तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. ते आता तुरुंग विभागाचे महासंचालक बनले आहेत. गेल्या महिन्यातच राज्य शासनाने हे पद निर्माण केले होते. यामुळे राज्य पोलीस दलामध्ये आता महासंचालक दर्जाची सात पदे झाली आहेत.
बिहारी हे गेल्या दीड वर्षापासून राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या अपर महासंचालकपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती न झाल्यामुळे त्यांच्याकडेच आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम राहणार आहे.
भायखळा कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्टेच्या मृत्यूनंतर तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. बिहारी यांच्याकडे तुरुंग विभागाची जबाबदारी सोपविण्यात आल्यामुळे तुरुंगातील प्रश्न मार्गी लागतील.
अशात यातील महत्त्वाचे असे राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुखपद गेल्या पावणेदोन वर्षांपासून रिक्त आहे. सर्वांचेच याच पदाकडे लक्ष लागून होते. तर दुसरीकडे पांडे आणि बिहारी यांच्या बढतीमुळे रिक्त झालेले उपमहादेशक होमगार्ड व उपसंचालक नागरी संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था अप्पर महासंचालकपदी नव्या अधिकाºयांची नियुक्ती करण्यात येईल. अशात येत्या नवीन वर्षात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पोलीस आयुक्तपदी काय बदल होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.