देशातील लष्करी रुग्णालयांत दिव्यांगांसाठी सुविधा वाढविणार : लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:05 PM2019-05-11T17:05:46+5:302019-05-11T17:08:40+5:30
पुण्यातील कृत्रिम अंग केंद्रामुळे अशा अनेक जवानांना कृत्रिम अंगे बसवून त्यांची कार्यक्षमता पुन्हा वाढविली आहे.
पुणे : ‘‘ देशाच्या सीमांचे रक्षण करताना अनेक जवानांना अपंगत्व आले आहे. पुण्यातील कृत्रिम अंग केंद्रामुळे अशा अनेक जवानांना कृत्रिम अंगे बसवून त्यांची कार्यक्षमता पुन्हा वाढविली आहे. या केंद्राचे काम हे स्तुतीयोग्य आहे. देशातील सर्व लष्करी दवाखाने तसेच विद्यालयांत दिव्यांगांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा वाढविण्यात येणार आहेत. यासाठी त्यांना आर्थिक, तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, हे काम प्रगतिपथावर आहे,’’ असे प्रतिपादन लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपिन पुरी यांनी केले.
पुण्यातील लष्करी वैद्यकीय सेवेच्या कृत्रिम अंग केंद्राच्या हीरकमोहत्सवी वर्धापन दिनानिमित्त या केंद्रात विविध कार्यक्रम तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल पुरी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन मेजर जनरल माधुरी कानिटकर, एअर मार्शल आर. एस. ग्रेवाल, मेजर जनरल एस. ए. लांबा, कृत्रिम अंग केंद्राचे प्रमुख ब्रिगेडिअर ए. सी. सिंग तसेच वैद्यकीय सेवेशी निगडित निवृत्त लष्करी अधिकारी या वेळी उपस्थित होते.
पुरी म्हणाले, ‘‘देशाच्या सरंक्षणासाठी लढताना अपंगत्व आलेल्या जवानांच्या साहसासाठी लष्कराने २०१८ हे वर्ष समर्पित केले. एखादा व्यक्ती अपंग झाल्यावर तशा स्थितीत जगताना तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. बºयाचदा मनोबल कमी होते. यामुळे त्या व्यक्तीबरोबरच तिच्या घरच्यांवरही या परिस्थितीचा परिणाम होत असतो. पुण्यातील कृत्रिम अंग केंद्राने अशा जवनांचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक कृत्रिम अंगांचा विकास केला आहे. यामुळे अपंगत्व आलेल्या जवानांना या कृत्रिम अंगामुळे पूर्वीसारखी हालचाल करता येत आहे. गेल्या काही वर्षांत या केंद्राने चांगली कामगिरी केली आहे. कृत्रिम अंगांच्या विकासात मोलाची कामगिरी बजावली आहे. आज अपंग जवानांमध्येही आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली आहे. येत्या काळात अपंग जवनांना कुठल्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी देशभरात कृत्रिम अंग केंद्राच्या उपविभागाची निर्मिती करण्यात आली असून त्यांना आर्थिक तसेच अनेक सुविधा पुरविल्या जात आहेत. याचबरोबर त्यांना चांगल्या सुविधा देण्यावर यापुढे भर राहील.’’
........
आजी-माजी अधिकाºयांचा सत्कार निवृत्त अधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या कार्याचाही या वेळी गौरव करण्यात आला.