Bipin Rawat: 'ती' भेट अखेरची ठरली! २४ दिवसांपूर्वी ‘सीडीएस’ बिपिन रावत यांचे नागपुरात ‘सॅल्यूट’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 05:53 AM2021-12-09T05:53:07+5:302021-12-09T05:53:42+5:30
वायुसेनेच्या मेन्टेनन्स कमांडला भेट : विभागाच्या आत्मनिर्भरतेबाबत काढले होते गौरवोद्गार
नागपूर : ‘सीडीएस’ जनरल बिपिन रावत... ओतप्रोत भरलेले देशप्रेम, राष्ट्रसुरक्षेप्रति सदैव सजग, तीनही संरक्षण दलाची इत्थंभूत माहिती, करारी आवाज अन् भेदक नजर. त्यांचे नाव घेताच ‘डिफेन्स’मधील प्रत्येक अधिकारी-जवानाची छाती गर्वाने भरून येत होती. देशाला सर्वोच्च प्राधान्य देणारे रावत हे २४ दिवसांपूर्वी नागपूरच्या भूमीवर होते. तीन आठवड्यांतच देशाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यामुळे येथील अधिकारी व जवानांना धक्का बसला आहे. रावत यांना काही दिवसांपूर्वी केलेले ‘सॅल्यूट’ अखेरचे ठरेल, याची त्यांनी स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती.
१५ नोव्हेंबर रोजी ‘सीडीएस’ जनरल बिपिन रावत यांनी भारतीय वायुसेनेच्या नागपुरातील मेन्टेनन्स कमांडला भेट दिली होती. त्याच दिवशी नागपुरातील अधिकाऱ्यांनी कडक ‘सॅल्यूट’ ठोकले होते. रावत यांनीदेखील त्याच जोशाने भाषण करत वायुदलाच्या आत्मनिर्भरतेबाबत गौरवोद्गार काढले होते. मेन्टेनन्स कमांड हा भारतीय वायुसेनेचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. वायुसेनेच्या अमूल्य संपत्तीची देखभाल करण्याची महत्त्वाची जबाबदारी या विभागावर आहे. हा विभाग वेगात आत्मनिर्भर होत आहे. मेन्टेनन्स कमांड आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे ते गर्वाने म्हणाले होते.
मेन्टेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी जनरल बिपिन रावत यांचे स्वागत केले होते व रावत यांनी स्वदेशी विमाने व उपकरणांच्या प्रदर्शनालादेखील भेट दिली होती.
‘मल्टी मोड ग्रेनेड्स’चीदेखील पाहणी
शेवटच्या नागपूर दौऱ्यादरम्यान जनरल बिपिन रावत यांनी ‘ईईएल’ला (इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड) भेट दिली होती व कंपनीतर्फे भारतीय सैन्यदलासाठी उत्पादित करण्यात आलेल्या ‘मल्टी मोड ग्रेनेड्स’ची पाहणी केली होती. सोबत त्यांनी इतर एक्सप्लोसिव्ह, मिसाईल्स, आर्म्ड ड्रोन्सचीदेखील पाहणी केली होती.