पक्ष्यांच्या चारा, पाण्यासाठी खुला केला ज्वारीचा मळा!

By admin | Published: January 14, 2016 02:20 AM2016-01-14T02:20:07+5:302016-01-14T02:20:07+5:30

राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना पक्ष्यांनाही त्याची झळ बसत आहे. त्यांना अन्न-पाण्यासाठी भटकावे लागत असल्याची दखल घेत एका शेतकऱ्याने थेट त्याचे साडेतीन

Bird feed, open water for the sorghum! | पक्ष्यांच्या चारा, पाण्यासाठी खुला केला ज्वारीचा मळा!

पक्ष्यांच्या चारा, पाण्यासाठी खुला केला ज्वारीचा मळा!

Next

- बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)
राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असताना पक्ष्यांनाही त्याची झळ बसत आहे. त्यांना अन्न-पाण्यासाठी भटकावे लागत असल्याची दखल घेत एका शेतकऱ्याने थेट त्याचे साडेतीन एकर ज्वारीचे शेत पक्ष्यांसाठी खुले केले आहे. एवढेच नव्हे तर त्याने पक्ष्यांसाठी चार पाणवठेही बांधले आहेत.
वांगदरी येथील शेतकरी प्रल्हाद निवृत्ती नागवडे यांच्या साडेतीन एकर शेतातील ज्वारीच्या टपोऱ्या कणसावर ऐटीत बसून विविध प्रकारचे पक्षी ताव मारताना दिसत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गाव घोड धरणाच्या लाभ क्षेत्रातील ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी ज्वारी, गव्हाच्या पिकांकडे मोर्चा वळविला आहे. प्रल्हाद नागवडे यांनी नऊ एकर शेतीपैकी साडेतीन एकर क्षेत्रात ज्वारीची पेरणी केली, पिकास खतपाणी घातले. त्यामुळे जोंधळ्याला चांदणे लगडले.
दुष्काळीस्थितीमुळे जिरायत भागातील विविध प्रकारचे पक्षी तहानभूक भागविण्यासाठी घोडच्या पट्टयात आले आहेत. प्रल्हाद नागवडे व त्यांचा मुलगा अविनाश यांनी पैशांचा विचार न करता ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पीव्हीसी पाईप कापून त्याचे पाणवठे तयार केले. विविध प्रकारचे पक्षी नागवडे यांच्या मळ्यात हक्काने येऊन भूक, तहान भागवित आहेत. अध्यात्मिक वारसा असलेले नागवडे कुटुंब तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे.

ईश्वराच्या सेवेपेक्षा पशुपक्ष्यांच्या सेवेतून अधिक समाधान मिळते. यात मोठा आनंद आहे. ‘पक्षी येती शेतात, आम्हा तोचि दिवाळी दसरा’. कायम दिवाळी, दसरा साजरा होण्यासाठी दरवर्षी ज्वारीचा मळा पक्ष्यांसाठी खुला करणार आहे.
- प्रल्हाद नागवडे, प्रगतशील शेतकरी, वांगदरी

दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे मार्च, मे महिन्यात पशुपक्ष्यांचे जीवनमान धोक्यात येणार आहे. आणीबाणीच्या काळात प्रत्येकाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून पशुपक्ष्यांसाठी पाणवठे तयार केले पाहिजेत. माणसांच्या जेवणावळी उठविण्यापेक्षा प्रल्हाद नागवडे यांचा आदर्श घेऊन उन्हाळ््याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी पशुपक्ष्यांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था करावी. सुटीचा आगळावेगळा आनंद लुटावा.
- ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय

Web Title: Bird feed, open water for the sorghum!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.