औटीवाडीच्या तलावात भरली पक्ष्यांची शाळा
By admin | Published: February 26, 2017 04:29 PM2017-02-26T16:29:23+5:302017-02-26T17:17:23+5:30
श्रीगोंदा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या औटीवाडी तलावावर परदेशी पाहुणा असलेल्या ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे
बाळासाहेब काकडे/ऑनलाइन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि. 26 - शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या औटीवाडी तलावावर परदेशी पाहुणा असलेल्या ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. प्रेमाचे प्रतीक असलेला हा पक्षी गुलाबी रंगाची उधळण करून पर्यटकांना वेगळीच भुरळ घालत आहे. या परदेशी पाहुण्याबरोबर अनेक जलचर पक्ष्यांची या तलावावर सध्याची शाळा भरल्याचे चित्र आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांत औटीवाडी तलावात पाणी नव्हते. त्यामुळे परदेशी पाहुण्याने औटीवाडी तलावाकडे पाठ फिरवली होती. पण गेली वर्षी पाऊस मुबलक झाला. कुकडीचे पाणी आले अन् औटीवाडीचा छोटा जलाशय तुडुंब भरला. त्यामुळे जलचर प्राणी व पक्ष्यांसाठी औटीवाडीचा तलाव पक्ष्यांना नंदनवन ठरले आहे. श्रीगोंदा शहराच्या आसपास बुलबुल, विविध प्रकारचे बगळे, नाना प्रकारच्या घारी, पोपट, चिमणी, कावळे, शिंपी, वटवट्या, तांबट, मैना, दयाळ, कोतवाल (रामोशी, कोळशा), सातभाई, पाणकावळे, धनेश, भारद्वाज, साळुंखी, पिंगळे, हुप्पो, कोकीळ इत्यादी स्थानिक पक्षी वर्षभर नेहमी आढळतात.
वर्षा ऋतू संपून शरद ऋतूला प्रारंभ झाला, की श्रीलंका, भुतान, बांगलादेश, म्यानमार, तिबेट, मालदीव, पाकिस्तान या प्रांतांतून उजनी जलाशयाकडे विदेशी पक्षी येत असतात. जाण्या-येण्याच्या प्रवासात काही दिवसांच्या विश्रांतीसाठी मार्गावरील तलावावर मुक्काम ठोकतात. या पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो हा पक्षी आकर्षण ठरतो.
औटीवाडीच्या तलावावर फ्लेमिंगो करकोचा, पानकोंबडे, विविध जातीचे बगळे, पाणलव्हा, घारी, गिधाडे आदी पक्ष्यांची शाळा भरली असून, औटीवाडी तलावातील पक्वान्नांची चव चाखण्यासाठी स्पर्धा लागली आहे. औटीवाडी तलावाच्या परिसरातील गहू, ज्वारी, हरभरा, हिरव्या मिरच्या, मका आणि फळे इतर पक्ष्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे हवेत पाण्यात विहार करणाऱ्या मित्रांची चांगलीच चंगळ आहे. काही पक्ष्यांनी औटीवाडी तलावाशेजारील जंगलातील झाडांवर वर्षभरासाठी खोपे, घरटी विनण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे परिसरात पक्ष्यांची वसाहत तयार होणार आहे . (तालुका प्रतिनिधी)
वाळूउपसा डोकेदुखी
औटीवाडी तलावावर रात्रीच्या वेळी बेकायदेशीर बेसुमार वाळूउपसा केला जात आहे. वाळूउपसा करण्याऱ्या मशिनरीचा आवाज हा पक्ष्यांची डोकेदुखी ठरत आहे. वाळूउपशाचे चित्र असेच राहिले, तर पक्षी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करतील आणि औटीवाडी तलावातील पक्ष्यांची शाळा बंद पडण्याचा धोका आहे. याकडे पर्यावरणप्रेमींनी लक्ष देण्याची गरज आहे.