शत्रूंच्या हालचालींवर ‘पंछी’ची नजर!
By admin | Published: January 11, 2015 01:38 AM2015-01-11T01:38:56+5:302015-01-11T01:38:56+5:30
जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भाग, बर्फाच्छादित प्रदेश असोत की राजस्थानमधील वाळवंट या भागात घुसखोरी करणाऱ्यांवर आता ‘पंछी’ करडी नजर ठेवणार आहे.
राहुल कलाल - पुणे
जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भाग, बर्फाच्छादित प्रदेश असोत की राजस्थानमधील वाळवंट या भागात घुसखोरी करणाऱ्यांवर आता ‘पंछी’ करडी नजर ठेवणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) अत्युच्च क्षमतेचे मानवविरहित विमान विकसित केले. त्यास ‘पंछी’ हे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे रिमोट कंट्रोलने चालणारे हे विमान अति उंचीवरील धावपट्टीवरही उतरू शकेल़
सध्या लष्कराकडे मानवविरहित ‘निशांत’ विमान आहे. याच्या माध्यमातून शत्रूच्या भागात जाऊन टेहळणी करता येते. पण या विमानाची क्षमता अधिक नसल्याने ते अति दुर्गम भागात पोहोचू शकत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी ८ महिने संशोधन करून ‘पंछी’ या मानवविरहित विमानाची निर्मिती केली. आतापर्यंत लष्कराकडे असलेली मानवविरहित विमाने ही धावपट्टीवरून कधीच उडू शकत नव्हती. ती रिमोट कंट्रोलने खाली आणावी लागत होती. मात्र ‘पंछी’ धावपट्टीवरून उड्डाण करू शकणार आहे. त्यामुळे अति उंचीवर, डोंगरावर हे विमान सहजरीत्या उतरविणे शक्य होणार आहे.
डीआरडीओच्या अॅरिनॉटिकल सिस्टीम विभागाचे महासंचालक डॉ. के. तमिळमणी म्हणाले, की गेल्या आठ महिन्यांपासून अॅरॉनॉटिकल डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंटमधील शास्त्रज्ञ यावर संशोधन करीत होते. त्यातून ‘पंछी’ या अत्याधुनिक मानवविरहित विमानाची निर्मिती झाली. याची क्षमता आतापर्यंतच्या इतर विमानांपेक्षा जास्त आहे आणि ते कंट्रोल करण्याची रेंजही वाढविण्यात आली आहे. हे दिवसा आणि रात्रीही टेहळणी करू शकेल.
हिमवर्षाव, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत उड्डाणाची याची क्षमता आहे.
युद्धातही टेहळणी करणार युद्ध सुरू असताना तेथील टेहळणी करण्याची क्षमता ‘पंछी’मध्ये आहे. शत्रूंच्या तोफांची अचूक माहिती हे विमान लष्कराला देऊ शकेल, असे तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. याचबरोबर उच्च क्षमतेची छायाचित्रे काढण्याचीही यात क्षमता आहे.