पंछी, नदिया, पवन के झोकें, कोई सरहद ना इन्हे रोके
By admin | Published: November 5, 2016 06:13 AM2016-11-05T06:13:49+5:302016-11-05T08:12:34+5:30
असं म्हणतात की, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. याचाच प्रत्यय एका प्रेमी युगुलाच्या निमित्ताने आला आहे.
मुंबई : असं म्हणतात की, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. याचाच प्रत्यय एका प्रेमी युगुलाच्या निमित्ताने आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधून सध्या विस्तव जात नाही, हे वास्तव असले तरी प्रेमाच्या चिरंतन सत्याने या परिस्थितीवरही मात केली आहे. मुंबईचे मोइज आमीर (३०) आणि कराचीतील फातेमा गाडीवाला यांचा साखरपुडा नुकताच झाला. या प्रेमाने ‘सरहद’ ओलांडून मानवी नात्याला नवे परिमाण दिले आहे.
मुंबईतील मोइज आणि कराचीत जन्मलेल्या फातेमा यांचा परिचय याच वर्षी जानेवारीत एका नातेवाइकाच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर हे दोघेही प्रेमात पडले. याबाबत आमीर म्हणतात की, भारताच्या विभाजनानंतर आमचे नातेवाईक कराचीत स्थायिक झाले. दरम्यान, आमच्या कुटुंबाकडून मुलगी पाहणे सुरू होते. आम्हाला असे कळले की, फातेमाचे कुटुंबीयही तिच्यासाठी मुलाच्या शोधात आहेत. दोन्ही कुटुंबांनी आमच्या विवाहासाठी होकार दिल्यानंतर आम्ही दोघे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो.
आणखी वाचा
मध्य रेल्वेवर धावणार १0 बम्बार्डियर लोकल?
वाहक-चालकांची ‘कॅनेडियन’ वेळापत्रकातून सुटका नाही
शिवस्मारक जागेवरून मच्छीमार आक्रमक
फातेमा यांचा व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू
फातेमा यांचा व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. शहरात एका वेब पोर्टलमध्ये काम करणाऱ्या आमीर यांनी सांगितले की, ‘सगाई’साठी फातेमा, तिची आई, भाऊ, काका यांना भारतात येण्यासाठी पाकिस्तानातील भारतीय दूतावासाने खूप सहकार्य केले. या आठवड्याच्या सुरुवातीलाच फातेमा आपल्या नातेवाइकांसह भारतात आली. दक्षिण मुंबईमध्ये गुरुवारी धूमधडाक्यात त्यांची ‘सगाई’ झाली. यावेळी दोन्ही कुटुंंबातील सदस्य उपस्थित होते. पुढील वर्षी सुरुवातीलाच ‘निकाह’ आणि रिसेप्शन समारंभासाठी आमीर कराचीत जाणार आहेत. आईसह स्वत:चा व्हिसा काढण्यासाठी ते आता दिल्लीस्थित पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क करणार आहेत.
आमीर म्हणाले की, दोन्ही देशातील सरकारला आम्ही या विवाहाच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की, जर आम्ही चर्चेसाठी प्रेमाची भाषा वापरली, तर राहण्यासाठी जगातील ही सर्वात चांगली जागा होऊ शकते. भारतात येण्यासाठी आपण अतिशय उत्सुक असल्याचे फातेमाने सांगितले.