देशभरातील पक्ष्यांचे होणार सर्वेक्षण!

By admin | Published: December 23, 2015 02:32 AM2015-12-23T02:32:18+5:302015-12-23T02:32:18+5:30

बीएनएचएसचा उपक्रम; पक्षी संवर्धनास होणार मदत.

Birds will be surveyed across the country! | देशभरातील पक्ष्यांचे होणार सर्वेक्षण!

देशभरातील पक्ष्यांचे होणार सर्वेक्षण!

Next

विवेक चांदूरकर/ वाशिम : दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. यामागील कारणे व उपाय शोधण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) पुढाकार घेतला आहे. या सोसायटीच्या वतीने देशभरातील पक्ष्यांच्या नोंदी घेवून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यातून पक्ष्यांची कमी होणारी संख्या व त्यामागील कारणं स्पष्ट होण्यास मदत होईल. वाढते प्रदुषण, शहरीकरण व जंगलतोडीमुळे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या. माळढोक, तणमोरासारख्या काही पक्ष्यांची संख्या अत्यंत कमी असून, त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनाकडे शासन तसेच पक्षीमित्रांचे लक्ष आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही करण्यात येत आहे; मात्र मोबाईल फोन टॉवर, वाढते शहरीकरण व प्रदुषणामुळे एरव्ही मोठय़ा प्रमाणात दिसणार्‍या चिमण्या, बुलबूल, कबूतरं, कावळे या पक्ष्यांचीही संख्या कमी होत आहे. त्यामुळे सामान्य पक्ष्यांच्या नोंदी घेण्याकरिता कॉमन बर्ड मॉनिटरींग प्रोग्राम (सीबीएमपी) अर्थात सामान्य पक्षी निरीक्षण उपक्रम बीएनएचएसच्या वतीने नियोजनबद्धरित्या सुरू आहे. बीएनएचएसचे प्रकल्प अधिकारी नंदकिशोर दुधे भारतातील संस्थांच्या मदतीने हा प्रकल्प राबविणार आहेत. याकरिता प्रत्येक जिल्ह्यात विविध पक्षीमित्रांची मदत घेण्यात येणार आहे. पक्ष्यांच्या नोंदी घेण्याकरिता ट्रान्झीट लाईन मेथडचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता गुगल अर्थ आणि जीआयएस या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जाणार आहे. जीआयएसच्या माध्यमातून देशभरात राज्यनिहाय ग्रीड टाकण्यात आले आहे. प्रत्येक ग्रीड २ बाय २ किमी असणार आहे. ट्रान्झीट लाईन टाकून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पक्षीमित्रांना वर्षातून तीनवेळा पक्ष्यांच्या नोंदी घ्याव्या लागणार आहेत. या नोंदी घेतल्यानंतर त्याची माहिती बीएनएचएसने दिलेल्या डाटा टेबलमध्ये भरून मुंबईला पाठवावी लागणार आहे. मुंबई येथे देशभरातून येणारा डाटा गोळा करण्यात येणार आहे. तीनही ऋतूंमध्ये घेणार नोंदी उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये पक्ष्यांची संख्या कमी जास्त होते. हिवाळ्यात विदेशातून अनेक पक्षी देशात स्थलांतर करतात, तसेच उन्हाळी स्थलांतर करणारेही काही पक्षी असतात. पावसाळ्यात काही पक्षी चातकासारखे निदर्शनास पडतात. प्रत्येक ऋतूमध्ये पक्ष्यांचे व्यवहार वेगवेगळे असतात. त्यामुळे या उपक्रमांतर्गत तीनही ऋतूंमध्ये पक्ष्यांचे निरीक्षण करण्यात येणार असून, त्याविषयी नोंदी घेण्यात येणार आहे. नोंदीनंतर काढणार निष्कर्ष देशभरातून सामान्यत: आढळणार्‍या पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. काही वर्षे पक्ष्यांची संख्या, त्यांचा आढळ, त्यांचे व्यवहार याच्या नोंदी घेवून त्याचे अवलोकन केल्यानंतर पक्ष्यांची संख्या कमी होतेय का, तसेच त्यामागील कारणे आणि उपाय, याचा निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे. देशभरातील पक्ष्यांची नावे, संख्या याचीही आकडेवारी यानिमित्ताने जमा होणार आहे.

Web Title: Birds will be surveyed across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.