संगीतकार दत्तात्रेय शंकर डावजेकर यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 09:31 AM2016-11-15T09:31:23+5:302016-11-15T09:31:23+5:30

दत्ता डावजेकर हे मराठीतील संगीतकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना 'डीडी' या टोपणनावानेही ओळखले जाई. इ.स. १९४१ सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले होते.

The birth anniversary of musician Dattatreya Shankar Davjekar | संगीतकार दत्तात्रेय शंकर डावजेकर यांची जयंती

संगीतकार दत्तात्रेय शंकर डावजेकर यांची जयंती

Next

 - प्रफुल्ल गायकवाड

मुंबई, दि. 15 - दत्ता डावजेकर हे मराठीतील संगीतकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना 'डीडी' या टोपणनावानेही ओळखले जाई. इ.स. १९४१ सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले होते.
 
दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता 'आपकी सेवामें' आणि गाणे होते 'पा लागूं कर जोरी रे'. तसेच मराठी चित्रपट होता 'माझं बाळ'. डावजेकरांनी त्यानंतर आशा मंगेशकर (भोसले), उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली.
 
दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशात आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्‍या डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २०रूपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्त डावजेकरांनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डावजेकरांचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले.
 
त्यानंतर त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवलकोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या संगीतरचना केल्या. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली.
 
दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते अशी आहेत.
 
१) आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी- गायिका : लता मंगेशकर
२) कुणि बाई, गुणगुणले। गीत माझिया ह्रुदयी ठसले॥ -गायिका: आशा भोसले
३) गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना। गेला कुठे माझा राजा, राजा येईना॥ – गायिका: लता मंगेशकर
४) थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी । बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती ॥ – गायिका: आशा भोसले
५) तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला ! -  गायिका: लता मंगेशकर
 
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. डीडींची अजून काही गाजलेली गाणी अशी आहेत.
 
१) ऊठ शंकरा सोड समाधी-चित्रपट: पडछाया-गायिका : रेखा डावजेकर
२) अंगणी गुलमोहर फुलला- गायिका : माणिक वर्मा
३) आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही- चित्रपट: वैशाख वणवा- गायिका: सुमन कल्याणपूर
४) गोमू माहेरला जाते हो नाखवा-चित्रपट: वैशाख वणवा. गायक: पं.जितेंद्र अभिषेकी
५) गंगा आली रे अंगणी- चित्रपट:संथ वाहते कृष्णामाई
६) या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती- चित्रपट पाठलाग- गायिका: आशा भोसले
७) तुझे नि माझे इवले गोकुळ – चित्रपट: सुखाची सावली. गायक-गायिका: लता आणि हृदयनाथ मंगेशकर
८) संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट: संथ वाहते कृष्णामाई- गायक: सुधीर फडके
९) रामा रघुनंदना,रामा रघुनंदना – चित्रपट: सुखाची सावली – गायिका: आशा भोसले
१०) बाई माझी करंगळी मोडली- चित्रपट: पडछाया- गायिका:आशा भोसले
१९९२ साली डीडींनी शेवटचा चित्रपट केला.
 
वयाच्या नव्वदाव्या वर्षी डीडींचे १९ सप्टेंबर २००७ रोजी त्यांच्या राहत्या घरी तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
 

Web Title: The birth anniversary of musician Dattatreya Shankar Davjekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.