साने गुरूजी यांची जयंती
By Admin | Published: December 24, 2016 10:27 AM2016-12-24T10:27:47+5:302016-12-24T10:27:47+5:30
राष्ट्र सेवा दल माझा प्राण आहे हे सांगणारे,धडपडणा-या मुलांचे गुरूजी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक अशी ओळख...
राष्ट्र सेवा दल माझा प्राण आहे हे सांगणारे,धडपडणा-या मुलांचे गुरूजी म्हणजेच आपले साने गुरुजी यांची आज जयंती.
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्र सेवा दलाचे संस्थापक सैनिक,समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. 'श्यामची आई', 'नवा प्रयोग', 'सुंदर पत्रे', 'हिमालयाची शिखरे', 'क्रांती', 'समाजधर्म', 'आपण सारे भाऊ' इत्यादी त्यांचे विपूल साहित्य प्रसिद्ध आहे.
गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे'
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे