पित्याच्या अवयवदानाप्रसंगी कन्येचा जन्म
By admin | Published: October 28, 2016 05:08 AM2016-10-28T05:08:57+5:302016-10-28T05:08:57+5:30
कोस आसवे गाळू, नकोस हुंदके देऊ, मी असेन तुझ्याच ठायी, स्पंदनाचे सोहळे माझेच गीत गायी़ पाच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या संतोष मोरे व भाग्यश्री
नांदेड : नकोस आसवे गाळू, नकोस हुंदके देऊ, मी असेन तुझ्याच ठायी, स्पंदनाचे सोहळे माझेच गीत गायी़़़
पाच वर्षांपूर्वी लग्न झालेल्या संतोष मोरे व भाग्यश्री मोरे या दाम्पत्याच्या आयुष्याची स्पंदनं टिपणाऱ्या या आशयगर्भ काव्यपंक्ती जन्म-मृत्यूच्या एका अनोख्या सोहळ्याला साजेशाच ठरल्या...
अपघातात ब्रेनडेड झालेल्या संतोष मोरे यांच्या अवयवदानाची प्रक्रिया सुरू असताना त्याच रुग्णालयात पत्नी भाग्यश्रीच्या पोटी कन्यारत्न जन्मले... दैवगतीच्या या विलक्षण योगायोगाने उपस्थितांचे हृदय हेलावून गेले नाही तरच नवल! कंधार तालुक्यातील संतोष उद्धवराव मोरे (वय २८) यांचा मारतळा येथे दुचाकी वाहनांच्या अपघातात बे्रनडेड झाला़ संतोष यांच्या नातेवाईकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला़ मात्र २६ आॅक्टोबर रोजी अवयव दानाची प्रक्रिया काही कारणास्तव होवू शकली नाही़ त्यामुळे २७ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता संतोष यांचे यकृत मुंबईला तर मुत्रपिंड औरंगाबादकडे रवाना झाले़ नांदेडमध्ये झालेले हे दुसरे ग्रीन कॉरिडॉर होते.
शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात या अवयव दानाची लगबग सुरू असतानाच, दुसरीकडे संतोषची पत्नी भाग्यश्रीला प्रसुतीकळा सुरू झाल्या. सकाळी सहा वाजता याच रुग्णालयात तिने कन्यारत्नाला जन्म दिला. एकीकडे पुत्रप्राप्तीचा आनंद, तर दुसरीकडे पतीच्या निधनाचे दु:ख. नियतीने टाकलेल्या या डावाने भाग्यश्रीला पुरते नि:शब्द केले. तशाच अवघडलेल्या अवस्थेत तिने बाळाचे मुख पाहाण्याअगोदर जग सोडून गेलेल्या पतीच्या अवयव दानाच्या पत्रावर स्वाक्षरी केली.
पानशेवडी (ता. कंधार) येथील संतोष मोरे हे मुंबई येथे जहाज बांधणीच्या कंपनीत नोकरीला होते. सुखी संसारात रमलेल्या संतोष, भाग्यश्री यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन ३१ आॅक्टोबर रोजी होणार होते़ दिवाळीनिमित्त गावाकडे आलेले संतोष आपल्या बाळाच्या आगमनाची तयारी करीत होते़ सोमवारी ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी नायगावला गेले होते़ तेथून मोटारसायकलवर परत येत असताना मारतळा येथे टिप्परला धडक होवून ते गंभीर जखमी झाले़ त्यातच त्यांना ब्रेनडेड झाला.
अवयवदानानंतर संतोष मोरे यांच्या पार्थिवावर पानशेवडी (ता. कंधार) येथे गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़
(प्रतिनिधी)
विमान कंपनीने कमी केले आयुष्याचे मोल!
- संतोषचे हृदय मुंबई येथील फोर्टीस रुग्णालयातील एका महिलेला देण्याबाबत सर्व चाचण्याही पूर्ण झाल्या होत्या. मात्र ऐनवेळी विमान कंपनीने जादा भाड्याची मागणी केल्याने या प्रक्रियेस विलंब झाला.
त्या विलंबात हृदय आवश्यक
असलेल्या महिलेचा मृत्यूही झाला तर दुसरीकडे नांदेडमध्ये संतोष मोरे यांच्या अवयवदानाची प्रक्रियाही रखडली. या सर्व संतापजनक बाबी गुरुवारी पुढे आल्यात. विमान कंपनीने आयुष्याचे मोल कमी केल्याचेच या घटनेतून पुढे आले आहे.
म्हणून ती ‘संजीवनी’ : संतोषच्या मरणोपरांत अवयवदानातून पाच जणांचे आयुष्य फुलले. त्यामुळे याप्रसंगी जन्माला आलेल्या त्यांच्या कन्येचे ‘संजीवनी’ असे नामकरण रुग्णालय अधिष्ठाता काननबाला येळीकर यांनी केले. त्यानंतर सर्वांनीच तिला संजीवनी या नावाने हाक मारली़