वर्ध्यात जन्मताच मिळतो ‘आधार’
By admin | Published: May 24, 2017 02:53 AM2017-05-24T02:53:35+5:302017-05-24T02:53:35+5:30
नवजात बालकाच्या आधार नोंदणीसाठी महिन्याची मुदत निर्धारित असताना वर्ध्यात मात्र जन्मानंतर काही तासांतच ही नोंदणी
रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नवजात बालकाच्या आधार नोंदणीसाठी महिन्याची मुदत निर्धारित असताना वर्ध्यात मात्र जन्मानंतर काही तासांतच ही नोंदणी करण्याची धडाडी प्रशासन दाखवित आहे. अशी सुपरफास्ट नोंदणी करणारे वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यातील बहुदा पहिलेच रुग्णालय असावे!
बालक व त्याच्या पालकांना रुग्णालयातून बाहेर गेल्यानंतर आधार नोंदणीसाठी इतरत्र भटकावे लागणार नाही, याची काळजी घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांची आधारनोंदणी सुरू आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. महिलेची प्रसूती झाल्याच्या काही तासांतच तो या बालकाची नोंदणी करीत आहे. नोंदणी झाल्यानंतर त्या चिमुकल्याचे आधार कार्ड त्याच्या घरच्या पत्त्यावर टपालाने पोहोचविण्यात येते.