वाशिम जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ!
By Admin | Published: May 4, 2017 01:34 AM2017-05-04T01:34:48+5:302017-05-04T01:34:48+5:30
‘बेटी बचाओ’ची शपथ : लिंगगुणोत्तर पोहोचले ९०६ वर
सुनील काकडे - वाशिम
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या उपक्रमांना जिल्ह्यात यश मिळत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. यावर्षी मुलींच्या जन्मदरात ४३ ने वाढ झाली आहे. दरम्यान १ मे रोजी आयोजीत ग्रामसभेत ग्रामपंचायतींनी बेटी बचाओ अभियान आणखी जोमात राबविण्याचा निर्धार केला आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यानुषंगाने राज्यातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली, जालना आणि वाशिम या दहा जिल्ह्यांमध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबविले जात आहे. वाशिम जिल्ह्यात बेटी बचाओ अभियानाला काहीसे यश आले असून यावर्षी मुलींचा जन्मदर ४३ ने वाढून प्रत्येक हजार मुलांमागे ९०६ वर पोहचला आहे. गतवर्षी हा जन्मदर ८६३ असा होता.
१ मे रोजी झालेल्या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायतींनी बेटी बचाओ अभियान आणखी गतीमान करण्याचा निर्धार केला आहे. या ग्रामसभेला उपस्थित महिला-पुरूषांनी याबाबत शपथ घेतली.
‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’अभियान तसेच इतर महत्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आले असून त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. सन २०११ मधील लोकसंख्येवर आधारित सन २०१५ मध्ये वाशिममध्ये प्रती हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण ८६३ होते, ते २०१७ मध्ये ९०६ वर पोहचले आहे. मात्र, एवढ्यावरच समाधान न मानता हे लिंगगुणोत्तर हजार करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.
- योगेश जवादे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण, जि.प., वाशिम