एक हृदय, यकृत असलेल्या सयामी जुळ्यांचा लातुरात जन्म
By admin | Published: June 18, 2016 11:21 PM2016-06-18T23:21:26+5:302016-06-18T23:21:26+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात २१ वर्षीय महिलेने सयामी जुळ्या बालकांना जन्म दिला़ बाळास दोन हात, दोन पाय, दोन स्वतंत्र डोके असले
डॉक्टरांचा दावा : ५० लाखांच्या प्रसुतीतील ही दुर्मीळ घटना़.
लातूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात २१ वर्षीय महिलेने सयामी जुळ्या बालकांना जन्म दिला़ बाळास दोन हात, दोन पाय, दोन स्वतंत्र डोके असले तरी दोघांची छाती एकमेकांना चिटकली आहे व हृदय आणि यकृत मात्र दोघात एकच आढळून आले आहे़ मात्र सर्वोपचार रुग्णालयातील प्रसुती तज्ञांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजता सदरील महिलेचे सीझर केले़ ५० लाख प्रसुतीमध्ये अशा प्रकारची एखादीच दुर्मीळ घटना असते, असा दावा डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे़ मुळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथील रहिवाशी असलेल्या तस्लीम अहमद मासुलदार या महिलेने या सयामी बाळांना जन्म दिला आहे़
तसलीम यांचा एक वर्षापूर्वीच सास्तूर येथील अहेमद मासुलदार यांच्याशी विवाह झाला होता़ त्या आपल्या पतीसोबत महाड येथे मजुरीसाठी गेल्या होत्या़ पाच महिन्यानंतर पोट दुखत असल्याने महाड येथे सोनोग्राफी करण्यात आली़ यावेळी त्या गरोदर असल्याचे त्यांना समजले़ तसेच पोटात जुळे असल्याचे निदर्शनास आले़ त्यानंतर त्या उपचारासाठी आपल्या गावात आल्या़ सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात डॉ़मनोज परबत यांनी तपासणी करून सयामी जुळे असल्याचे निदान केले़ ही प्रसुती अती जोखमीची असल्याने त्यांना शनिवारी सकाळी ११ वाजता लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले़ प्रसुती जोखमीची असल्याने डॉ़भाऊराव यादव यांच्या मार्गदर्शनात सोनोग्राफी करण्यात आली़ सायंकाळी ५ वाजता सदरील महिलेचे सीझर करण्यात आले असता दोन सयामी जुळे जन्माला आले़
अतिदक्षता विभागात असलेल्या या जुळ्यांवर बालरोग तज्ञ सुनिल होळीकर, डॉक़ीरण भाईसारे, ब्रदर भागवत मुंडे, प्रविण सोनटक्के हे लक्ष देऊन आहेत़ ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याबद्दल डॉक्टरांच्या टिमचे अधिष्ठाता डॉ़अशोक शिंदे यांनी कौतुक केले़
लातूर जिल्ह्यातील पहिले सयामी जुळे़...
५० लाख प्रसुतीत अशी एखादीच दुर्मीळ सयामी जुळे जन्माला येतात़ अशी ही दुर्मीळ घटना लातूर जिल्ह्यात पहिल्यांदाच घडल्याने लातूर जिल्ह्यातील पहिले सयामी जुळे असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले़
सयामी का म्हणायचे़...
फार वर्षापुर्वी अगोदर थायलंड देशात सीयाम या गावात असेच जुळे जन्माला आले होते़ ते सर्कसमध्ये काम करीत असल्यामुळे त्यांना सयामी जुळे म्हणून ओळखले जात असल्याने लातुरात या जन्मलेल्या या जुळ्यांनाही सयामी दुर्मीळ जुळे म्हणून डॉक्टरांनी संबोधले आहे़
बालकांची प्रकृती आता स्थिऱ़़...
नवजात अर्भक अतिदक्षता विभागात सयामी जुळ्यांवर बालरोग तज्ञ उपचार करीत आहेत़ सध्या या बालकांची प्रकृती स्थिर आहे, उपचार सुरु आहेत़ त्यामुळे पुढे काय हे आता सांगणे शक्य नाही़ सध्यातरी आई व बालकांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉ़भाऊराव यादव यांनी सांगितले़
गुंतागुंतीची सिझर शस्त्रक्रिया
सर्वोपचार रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जोखीम पत्कारून यशस्वी केली़ सकाळी आलेल्या या रुग्णाची शस्त्रक्रिया जोखमीची असल्याने सर्व विभागातील डॉक्टरांनी एकत्रित येऊन चर्चा केली. तसेच एक टीम तयार करून सायंकाळी ५ वाजता सदरील महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली. या टीममध्ये स्त्रीरोग तज्ञ डॉ़भाऊराव यादव, विभागप्रमुख डॉ़मंगला शिंदे यांच्यासह डॉ़श्वेता कलुरकर, डॉ़प्रिती मिरवलवाड, डॉ़अण्णासाहेब बिराजदार, डॉ़नितीन मदने, डॉ़निहारीका नागरगोजे, डॉ़स्वाती नरवडे, डॉ़मनोज परबत, भुलतज्ञ डॉ़दिपक कोकणे, डॉ़शैलंद्र चव्हाण, डॉ़उमेश देशमुख यांचा समावेश होता.