विख्यात कवी वसंत बापट यांचा जन्मदिवस

By Admin | Published: July 25, 2016 09:35 AM2016-07-25T09:35:38+5:302016-07-25T09:44:44+5:30

विख्यात कवी विश्वानाथ वामन बापट ऊर्फ मा. वसंत बापट यांचा आज (२५ जुलै) जन्मदिन.

Birthday of famous poet Vasant Bapat | विख्यात कवी वसंत बापट यांचा जन्मदिवस

विख्यात कवी वसंत बापट यांचा जन्मदिवस

googlenewsNext

संजीव वेलणकर

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २५ - विख्यात कवी विश्वानाथ वामन बापट ऊर्फ मा. वसंत बापट यांचा आज (२५ जुलै) जन्मदिन. क-हाड येथे २५ जुलै १९२२ साली जन्मलेले वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा)' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्न होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली.

१९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. मा.वसंत बापट यांचे २७ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

लोकमत समूहातर्फे मा.वसंत बापट यांना आदरांजली.

 

Web Title: Birthday of famous poet Vasant Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.