ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचा जन्मदिन

By Admin | Published: July 25, 2016 09:43 AM2016-07-25T09:43:06+5:302016-07-25T09:43:30+5:30

संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशातील नागरिकांनाही वेड लावणा-या 'गीतरामायण'चे गायक व संगीतकार मा.सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचा आज (२५ जुलै) जन्मदिन.

Birthday of senior composer Sudhir Phadke alias Babuji | ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचा जन्मदिन

ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचा जन्मदिन

googlenewsNext

संजीव वेलणकर

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २५ - संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशातील नागरिकांनाही वेड लावणा-या 'गीतरामायण'चे गायक व संगीतकार मा.सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचा आज (२५ जुलै) जन्मदिन. 

अनेक दशके चित्रपटसृष्टीत राहूनही तपस्वी असलेले, आपल्या कामाशी प्रामाणिकपणा, गुणग्राहकता जपलेल्या बाबूजींचा जन्म २५ जुलै १९१९ साली कोल्हापूरमध्ये झाला.  बाबुजींनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. बाबूजी ही एक ईश्वरी देणगी असल्याने त्यांनी कधीच चुकीची गाणी बनवली नाहीत. त्यांना बालगंधर्व व हिराबाई बडोदेकर यांच्या गीतांचा विशेष लळा होता. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील गीते त्या काळात खूपच गाजल्याने बाबूजींना खूप प्रसिद्धी मिळाली. स्वत: गायक, गीतकार असल्याने पुढे प्रभात चित्रपट संस्थेच्या माध्यमातून १९४६ मध्ये ते संगीतकार म्हणून उदयास आले. जुन्या पिढीतील पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी २९ मे १९४९ ला त्यांचा विवाह झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या विवाहात त्यांनी स्वत:च्या लग्नात मंगलाष्टके म्हटल्याचे सांगितले जाते.

कवी न. ना. देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून ‘सुधीर’ असे नामकरण केले. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’चे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीस आले. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे गीतरामायण १९५५ साली रेडियोवर सुरू झाले. बाबूजींचा सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार व नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते. १९४६ मध्ये ‘गोकुळ’ या पहिल्या सिनेमाला त्यांनी संगीत दिले. एकूण १११ सिनेमांना संगीत देताना त्यातील २१ हिंदी सिनेमा होते. गीतरामायणाची भुरळ संपूर्ण महाराष्ट्रात आजही कायम असून चित्रपट गीतांसह अनेक भावगीते व भक्तीगीते आजही रसिक मनावर राज्य करत आहेत. परिणामी सुधीर फडके आणि संगीत यांचे अतूट नाते आपण आजही अनुभवतो. अमेरिकेतील ‘इंडिया हेरीटेज फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. ‘हा माझा मार्ग एकला’ या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक १९६३ मध्ये पं. नेहरूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले. तर १९९१ साली राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय ‘मा. दिनानाथ संगीत पुरस्कार’ व राज्यशासनाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ व ‘सह्याद्री स्वररत्न पुरस्कार’ त्यांना लाभले. तरीही सरकारने त्यांना पद्म पुरस्कारापासून मात्र वंचित ठेवले. मा.सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.

 
मा. सुधीर फडके यांनी गायलेली,संगीत दिलेली काही गाणी
उमलेली एक नवी भावना
तुझ्या गळा माझ्या गळा
लळा जिव्हाळा
कानडा राजा पंढरीचा
वंद्य वंदे मातरमं
डोळ्यात वाच माझ्या 
धुंद एकांत हा
रुपास भाळलो मी
गीतरामायण
 
लोकमत समूहातर्फे मा.सुधीर फडके यांना आदरांजली.
 

 

Web Title: Birthday of senior composer Sudhir Phadke alias Babuji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.